'डेस्टिनेशन दिवाळी'ची क्रेझ वाढतेय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कुटुंबीयांसमवेत पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करण्याला मिळतेय पसंती
पुणे - डेस्टिनेशन वेडिंग किंवा डेस्टिनेशन यंगेजमेंट असते ना, अगदी तसेच आता "डेस्टिनेशन दिवाळी'चा ट्रेंड नव्याने पाहायला मिळतो आहे.

उत्सवातील आपला आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी हल्ली दुसऱ्या गावी जाऊन दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीत सलग सुट्ट्या मिळत असल्यामुळे एकत्रित फिरायला जाण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याबरोबरच वाराणसी, अमृतसर, जयपूर याबरोबरच परदेशी पर्यटनाचे जरा हटके पर्याय पसंतीस उतरत आहेत.

कुटुंबीयांसमवेत पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करण्याला मिळतेय पसंती
पुणे - डेस्टिनेशन वेडिंग किंवा डेस्टिनेशन यंगेजमेंट असते ना, अगदी तसेच आता "डेस्टिनेशन दिवाळी'चा ट्रेंड नव्याने पाहायला मिळतो आहे.

उत्सवातील आपला आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी हल्ली दुसऱ्या गावी जाऊन दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीत सलग सुट्ट्या मिळत असल्यामुळे एकत्रित फिरायला जाण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याबरोबरच वाराणसी, अमृतसर, जयपूर याबरोबरच परदेशी पर्यटनाचे जरा हटके पर्याय पसंतीस उतरत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळी आणि पर्यटन हे एक घट्ट समीकरण बनले आहे. यापूर्वी दहा-पंधरा दिवसांच्या दिवाळी सुटीचे नियोजन केले जायचे. आजही हे नियोजन केले जाते; पण फरक इतकाच की दहा-बारा दिवसांऐवजी पाच ते सात दिवसांचे नियोजन केले जात आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवास करणारे पर्यटक आता विमानप्रवासाला प्राधान्य देत आहेत. तर काहीजण नातेवाइकांसह पर्यटनाला जाण्यासाठी गाड्या भाड्याने घेणे पसंत करतात. साधारणपणे लक्ष्मीपूजनला आपण घरी असले पाहिजे, असे गृहीत धरून पर्यटनाचे नियोजन होत आहे. लक्ष्मीपूजनच्या आधी किंवा नंतरच्या तारखांचे आपापल्या सोयीनुसार नियोजन होत आहे.

मारवेल टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक स्मिता नाणेकर म्हणाल्या, ""दिवाळीसाठी मोठी सुटी असली, तरी चार ते पाच दिवसांत जाऊन येता येईल, अशी पर्यटनस्थळे निवडण्यावर भर दिला जात आहे. देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण वाढत असून गोवा, केरळ, गुजरात, अंदमान आणि निकोबारला पसंती दिली जात आहे. राज्यातील तारकर्ली, रत्नागिरी, दापोली, अलिबाग हे समुद्रकिनारेही पसंतीस उतरत आहेत. वीकेंडला जोडून आलेल्या दिवाळीच्या सुटीत दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी लोणावळा, माथेरान, महाबळेश्‍वर याबरोबरच मावळ पट्ट्यातील ठिकाणे निवडली जात आहेत.''
राजस्थानमध्ये फिरण्यासाठी ऑक्‍टोबरपासूनचा काळ सर्वांत चांगला मानला जातो. त्यामुळे राजस्थानलाही पसंती दिली जात आहे. याचबरोबर आग्रा, मथुरा, वृंदावन, वाराणसी, जयपूर, कोलकता अशा ठिकाणी जाण्याचे नियोजनही होत आहे. आजकाल अनेकजण "पैसा वसूल' पर्यटनावर भर देत आहेत. देशांतर्गत पर्यटनावर जितका खर्च केला जातो, त्यात थोडी भर घालून परदेशात फिरणं शक्‍य होत आहे. त्यामुळे दुबई, सिंगापूर, थायलंड, भूतान, मलेशिया, जॉर्डन, व्हिएतनाम, युरोप, स्वित्झर्लंड हे पर्यायही निवडले जात आहेत, असे "ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे'चे संचालक नीलेश भन्साळी यांनी सांगितले.

'आउट ऑफ रेंज'च्या ठिकाणांना प्राधान्य
धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला विश्रांती हवी असते. दिवाळीच्या सुटीतही पूर्णपणे विश्रांती मिळावी, यासाठी पर्यटनाचा पर्याय स्वीकारला जातो. परंतु, कुटुंबासमवेत पर्यटनाला गेल्यावर कुणाचा फोन येऊन "डिस्टर्ब' होऊ नये म्हणून टूर प्लॅनर, टूर एजन्सीकडे "आउट ऑफ रेंज'ची ठिकाणे सुचवा, अशी विचारणा होत आहे. याबद्दल नाणेकर म्हणाल्या, ""साधारणपणे पुणे आणि मुंबईचे पर्यटक हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची विचारपूस करत आहेत. त्यातही "आमच्या फोनला रेंज येणार नाही अशी ठिकाणे सुचवा', असेही सांगितले जात आहे.''

टॉप फाइव्ह दिवाळी डेस्टिनेशन
(पर्यटन क्षेत्रातील देशपातळीवरील एजन्सीजच्या म्हणण्यानुसार)

- दिल्ली आणि आग्रा
- वाराणसी
- जयपूर
- पश्‍चिम बंगाल
- अमृतसर

सामाजिक पर्यटनालाही पसंती
आजवर दरवर्षी आपण आपल्या घरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली, मग आता जरा घराबाहेर पडून इतरांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटू यात, याच विचारातून दिवाळीनिमित्त सामाजिक पर्यटनालाही पसंती दिली जात आहे. यासाठी मेळघाट, हेमलकसा, आनंदवन येथे जाऊन दिवाळी साजरी करण्याचे नियोजनही काहीजण करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: destination diwali craze increase