

मुसळधार पावसाने फळबागा,
भाजीपाला पिकांना फटका
रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण; भातपिकांचे नुकसान
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोमवारी (ता. २) पहाटेपासून दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्षासह विविध फळबागा आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. तर रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी (ता. २) बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. बारामतीमध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने ओढे-नाल्यांना पाणी आले होते. रस्तेही जलमय झाले होते. अशीच परिस्थिती चाकण, खेड आणि आळंदी परिसरात होती.
यंदा पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिकांचे उत्पादन घटले. यामध्ये सोयाबीन, भातासह विविध पिकांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जुन्नर तालुक्यात पावसाने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार केले; मात्र द्राक्ष आणि कांदा उत्पादकांची चिंता वाढवली आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी तीन दिवसांत सुमारे अडीच कोटी रुपयांची फवारणी करावी लागली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कापणी केलेले भातपीक पावसात भिजल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण परिसरात पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने प्रमुख रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. पावसाने हजेरी लावली; मात्र एका बाजूला दिलासा आणि दुसऱ्या बाजूला नुकसान, असे परस्परविरोधी चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ हवामान आणि पावसाने एकीकडे रब्बी पेरणीसाठी दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना मोठ्या संकटात टाकले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी केवळ तीन दिवसांत फवारणीवर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीत झालेल्या या पावसाने ऊस, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांच्या पेरणीचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, याच पावसाने द्राक्ष, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे. फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांवर डावणी आणि करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. चिखलगाव, कळमोडी परिसरात कापणीला आलेली आणि कापून ठेवलेली भातपिके जमीनदोस्त झाली असून, भाताचे दाणे गळून जात आहेत. यामुळे वर्षभराच्या उत्पन्नासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा खरीप हंगाम उशिरा सुरू होऊनही सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमदार होती. मात्र, ऐन ओंब्या भरण्याच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने अनेक पिकांमध्ये दाणेच भरले नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती, त्यांनी मोठ्या कष्टाने पिके जगवून वर्षभराच्या धान्याची सोय होईल, अशी आशा बाळगली होती.
ओंब्यांना मोड
कापणीच्या तोंडावर आलेल्या या पिकांवरच मुसळधार पावसाने घाला घातला. अनेक ठिकाणी कापणीयोग्य भातपिके भुईसपाट झाली आहेत, तर कापून ठेवलेल्या पिकांच्या ओंब्यांना मोड फुटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.