‘देवदूत’च्या कर्मचाऱ्यांना असते पगाराची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

‘देवदूत’कडील कर्मचारी 
७३  - ठेकेदाराचा दावा
२८  - अग्निशमन दलाचा दावा
१,८०० रु. - दरमहा  पगार

पुणे - आपत्ती निवारणाच्या ‘देवदूत’ योजनेच्या ठेकेदाराने पुणे महापालिकेकडून दीड वर्षात २५ कोटी रुपये वसूल करूनही कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगारही वेळेत मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. पगारात सातशे रुपयांची वाढ दिली. मात्र, त्याची वर्षभराच्या फरकाची रक्कम दिली नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. ‘आम्ही ‘देवदूत’चे की अग्निशमन दलाचे काम करतो? हेच आम्हाला कळत नाही. अग्निशमन दलाला मदत करतो. पण, मोबदला मिळत नसल्याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले. 

वादग्रस्त ठरलेल्या ‘देवदूत’ योजनेत रोज नवा गोंधळ पुढे येत आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनीही आता गाऱ्हाणे मांडण्यास सुरवात केली आहे.

पगार आणि अन्य काही तक्रारी केल्यास काम थांबविले जाण्याची भीतीही दाखविली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. 

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आज कर्वे रस्त्यावरील अग्निशमन दलातील ‘देवदूत’ वाहनाची पाहणी केली.

त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई
स्थायी समितीच्या आदेशानुसार या योजनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार मुदतीत अहवाल दिला जाईल. त्यात त्रुटी असल्यास दोषींवर कारवाई होईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी आज सर्वसाधारण सभेत सांगितले. याप्रकरणी सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर शर्मा यांनी खुलासा केला.

‘देवदूत’कडील कर्मचारी 
७३  - ठेकेदाराचा दावा
२८  - अग्निशमन दलाचा दावा
१,८०० रु. - दरमहा  पगार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devdoot employee wait for the salary