नगरसेवकांच्या हट्टामुळे रखडला विकास 

नगरसेवकांच्या हट्टामुळे रखडला विकास 

पुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे नगरसेवकांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. नियोजित कामांचे ठिकाण बदलण्यासोबत वर्गीकरणाच्या आग्रहामुळे बहुतांशी निविदा काढण्यात अडचणी येत असून, निविदांच्या अटी-शर्ती बदलण्याचा उद्योग होत असल्यानेच योजनांचा मुहूर्त हुकत असल्याचे दिसून आले आहे. कामे न होण्यास नगरसेवक जबाबदार असल्याचे प्रशासनानेही जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना फसण्यामागे प्रशासनापाठोपाठ नगरसेवकही जबाबदार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने सुमारे सव्वापाच हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. पुणेकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा शब्द भाजपे अर्थसंकल्पात दिला होता. प्रत्यक्षात अर्थसंकल्प जाहीर होऊन सात महिन्यांचा कालावधी संपला तरी, आतापर्यंत जेमतेम 14 टक्के इतकीच कामे सुरू असल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट आहे. तेव्हाच, ज्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा गाजावाजा करण्यात आला, त्यांचा वेगही मंदावला आहे. परिणामी, संपूर्ण शहराच्या विकासाला खीळ बसल्याची कबुली सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. तरीही आपण कामे करीत असल्याचा कांगावा प्रशासनाने केला. ही सभा संपताच भाजपच्या नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालयासह खात्यांकडील कामांचा हिशेब मांडला. तेव्हाच, काही प्रभागांमध्ये मोजक्‍याच कामांना सुरवात झाल्याचे दिसून आले आहे. त्यावरून भाजपने उघडपणे नाराजी व्यक्त करीत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. याआधी काही खातेप्रमुखांना बदलण्याचा प्रयत्नही झाला. विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि प्रशासना समोरासमोर आले आहे. 

महापालिकेचे अंदाजपत्रक : 5 हजार 250 कोटी 
सुरू असलेली कामे : अंदाजे 700 कोटी 

निविदा न काढल्याने कामे होत नाहीत. त्यामागे संगणकप्रणाली बिघाडाचे कारणही आहे. तसेच, निविदांच्या अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्याने निविदा काढण्यात अडचणी येतात. त्यामुळेही कामे रखडली आहेत. 
राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com