
Pune Bypoll Election : फडणवीस रचतायत खास प्लॅन? पुण्यात रात्री तब्बल 7 तास खलबतं
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उडी घेतल्यामुळे या दोन्ही निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचं दिसून येत आहे. तर या दोन्ही निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत.
एकीकडे पुण्यात प्रचाराचा धुरळा उडत असतानाच दुसरीकडे भाजपची कल रात्री एक महत्वाची बैठक पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस चार मंत्री उपस्थित राहिले होते. तब्बल सात तास ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुण्यातील विविध महत्वाच्या घटकातील प्रमुख लोकांची उपस्थिती दिसून आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील मोठा व्यापारी वर्ग आहे. त्यांच्यासोबत फडणवीस यांनी चर्चा केली आहे. भाजपकडून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्यासोबत मंत्री आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहेत. प्रचार सभा आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचे मुद्दे याशिवाय याच काळात केंद्रीय मंत्री अमित शाह देखील प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांच्या जेष्ठ नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्र लिहल होतं परंतु महाविकास आघाडी आपल्या मतांवर ठाम होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व घडामोडी यावर बैठका आणि काही उपाय सुचवले असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय घेतली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.