बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

ganpati
ganpati
Updated on

पुणे : मंगलमय चैतन्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची आज (ता.23) सांगता होत आहे. भक्तांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले आहेत. श्रींना वाजत गाजत निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी देखील जय्यत तयारी केली आहे. आनंदोत्सवात ढोलताशाच्या गजरात, बॅन्डच्या सुरावटीत, समाजप्रबोधनात्मक विचारांचा वसा जपण्यास कटिबद्ध झालेल्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढत वैभवशाली मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बहुतांश मंडळांनी साउंड सिस्टीमऐवजी पारंपरिक खेळ आणि वाद्यांना प्राधान्य देण्याचा मानसही व्यक्त केला आहे. 

दरम्यान, शनिवारी अनेक मंडळांमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम झाला. सत्यनारायणाच्या पूजेला कार्यकर्ते जोडीने बसले होते. बाप्पांना निरोप देण्यासाठी विसर्जन रथ तयार करण्यातही कार्यकर्ते रात्रभर व्यग्र होते. सायंकाळी सहानंतर लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक आणि शिवाजी रस्त्यावरील रामेश्‍वर चौक येथे मंडळांच्या विसर्जन रथांच्या रांगा लागू लागल्या. तर सत्यनारायणाचा प्रसाद स्वीकारत श्रींच्या दर्शनाचा लाभ देखील भक्तांनी घेतला. मानाच्या गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळांसहित अन्य प्रमुख मंडळांच्या श्रींचे दर्शन भाविकांनी घेतले, तसेच नारळांचे तोरणही वाहिले. 

पानसुपारीच्या कार्यक्रमानिमित्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या. लक्ष्मी रस्त्यावरून मुख्य मिरवणूक मार्गस्थ होणार आहे.

त्यामुळे रात्री बारानंतर या रस्त्यावरील मंडळांनी श्रींची उत्तर पूजा केली आणि मंडप उतरवायला सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत कोणत्या ढोलताशा पथकाला मंडळाच्या श्रींच्या समोर वादनाची संधी द्यायची यासंबंधीचे नियोजन विविध मंडळांचे कार्यकर्ते करत होते. पोलिसांतर्फे परवान्यानुसार मंडळांना विसर्जन रथ उभे करण्यास परवानगी देण्यात येत होती. एकापाठोपाठ एक विसर्जन रथ रांगेत येऊन उभे राहत होते. भाविकांना मिरवणूक पाहता यावी. यासाठी महापालिकेतर्फे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावर बॅरिकेड्‌स उभारण्यात येत होते. 

स्त्री, पुरुषांसाठी स्वतंत्र वेशभूषा 
पुण्यनगरीची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. मानाचे पाच गणपती बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अन्य मंडळांना परवान्यानुसार मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. काही मंडळांच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मिरवणुकीनिमित्त स्वतंत्र वेशभूषादेखील केली आहे. चांदीच्या पालखीत विराजमान श्रींची मूर्ती, समाजप्रबोधनात्मक तसेच विद्युत रोषणाईच्या देखाव्यांची वैविध्यता अनुभवत श्रींना निरोप देण्यासाठी परगावाहूनही भक्तमंडळी त्यांच्या आप्तेष्टांकडे आली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com