
आळंदी : असे मनोमन पांडुरंगचरणी प्रार्थना करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इंद्रायणी तीरी लाखो वैष्णवांचा मेळा जमला आहे. राज्यभरातून आलेल्या छोट्या मोठ्या साडेचारशेहून अधिक दिंड्या येथील विविध धर्मशाळा, राहूट्यात पाच दिवसांपासून विसावलेल्या होत्या. दिंडीतील वारकऱ्यांची इंद्रायणी घाटावरील रंगणारी भजने आणि टाळ मृदंगाच्या निनादात सारा परिसर भक्तिरसात आकंठ न्हाऊन निघाला. फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने देऊळवाडा उजळून निघाला. तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेतही भल्या पहाटेपासून भाविकांनी तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. हवेतील गारठ्याने आणि पावसाने चिंब भिजलेल्या भाविक वारकऱ्यांची भक्ती तसूभरही न ढळता ज्ञानोबा तुकारामांचा अखंड गजर करत भक्तिरसात तल्लीन असल्याचे चित्र आज अलंकापुरीत पाहायला मिळाले.