धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांच्या स्मारकासाठी निधी न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू -अशोक पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Pawar

धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांच्या स्मारकासाठी निधी न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू - अशोक पवार

केसनंद : धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांच्या स्मारकासाठी आघाडीसरकारकडून मंजुर २७० कोटींचा निधी लवकर देण्याबाबत येत्या अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करणार आहे, मात्र त्यानंतरही निधी न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याबरोबरच जनतेसोबत आंदोलनाचाही पर्यायही खुला असल्याचे सुतोवाच शिरुर - हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.

श्रीक्षेत्र तुळापूर येथे आळंदी - मरकळ - तुळापूर लोणीकंद राज्य मार्ग क्र. ११६ या रस्त्याच्या २२ कोटी खर्चाच्या सुधारणा कामाचे भुमिपुजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या सभामंडपाचे उद्घाटनही करण्यात आले. तर घोडगंगा कारखाना विजयाबद्दलही आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिपभाऊ कंद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला निरीक्षक लोचन शिवले, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, रुपेश शिवले, अनिल चोंधे, रुपेश ठोंबरे, नारायणराव फडतरे, सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, महिला तालुकाध्यक्षा सुरेखा भोरडे, योगेश शितोळे, विजय वाळुंज, राजाराम शिवले, पवन खैरे, जयवंत शिवले, शाम कोळपकर आदीं उपस्थित होते. यावेळी संतोष शिवले व राजाराम शिवले यांना राष्ट्रवादी उपाध्यक्षपदी निवडीचे पत्रही देण्यात आले.

आमदार पवार म्हणाले, ‘मागील बजेटमधील ९९ टक्के निधी हवेली तालुक्याला दिला असून यापुढेही निधी कमी पडू देणार नाही. सध्या आळंदी रस्त्याचेही कामही येत्या मार्चअखेर मार्गी लागतेय. सध्याच्या सरकारने विरोधी आमदारांना विकासनिधी दिला नाही, तसेच देशाचे भुषण असलेल्या छत्रपती संभाजीमहाराजांच्या स्मारकासाठी आघाडी सरकारने मंजुर केलेल्या २७० कोटींचा निधीही रोखला, ही बाब योग्य नाही. त्यासाठी येत्या अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्नही उपस्थित करणार असून प्रसंगी न्यायालयात दाद मागणे व जनतेसोबत आंदोलनाचाही पर्याय खुला आहे.‘ प्रास्ताविक प्रदिपभाऊ कंद यांनी केले, संतोष शिवले यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले तर ज्ञानेश्वर शिवले यांनी आभार मानले.

तुळापूर व परिसर विकासासाठी मंजुर निधी :

छत्रपती संभाजीमहाराज स्मारक व परिसर विकास : २७० कोटी

आळंदी - मरकळ - तुळापूर रस्ता : २२ कोटी

वाघोली-भावडी-तुळापूर रस्ता : ५ कोटी ३२ लाख रुपये

वढु बुद्रुक ते वढु खुर्द पुल व भुसंपादन : ३४ कोटी ८६ लाख

समाधिस्थळ रस्ता : १० लाख

’आमदार आपल्या गावी मुक्कामी’ उपक्रम तुळापूरातून सुरु.

गावागावात नागरीकांचे अनेक लहानमोठे प्रश्न गावातच सुटावेत, यासाठी ‘आमदार आपल्या गावी अधिकाऱ्यांसोबत मुक्कामी’ हा उपक्रम मतदार संघात सुरु केला आहे. या उपक्रमाची सुरुवात तुळापूरातून होणार आहे. या मुक्कामात प्रशासनातील संबंधित खात्यांचे अधिकारीही गावातच मुक्कामी राहणार असल्याने नागरीकांचे प्रश्न गावातच सुटणार आहेत.

प्रसंगी आंदोलनासाठीही जनतेचे पुर्ण पाठबळ -

आमदार अशोक पवार यांच्याच माध्यमातून हवेलीत भरीव निधीसह मोठा विकास झाला असून आळंदी रस्त्याचे कामही मार्गी लागतेय, ही समाधानाची बाब आहे. तसेच छत्रपती शंभुस्मारकाच्या रखडलेल्या कामाकरीता प्रसंगी आंदोलनासाठी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व जनता पुर्ण ताकदीने पाठीशी राहील.

प्रदिपभाऊ कंद, वरीष्ठ सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस.