ढेबेवाडी खोऱ्यात उदंड पिकला देशी पावटा
ढेबेवाडी खोऱ्यात उदंड पिकला देशी पावटा
पोषक वातावरणाची साथ; पायलीचे उत्पादन पोत्यात, शेतकऱ्यांत समाधान
ढेबेवाडी, ता. २९ : पोषक वातावरणाची साथ मिळाल्याने विभागातील शेतकऱ्यांना यंदा देशी पावट्याचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. गेल्या कित्येक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले पावट्याचे पीक प्रथमच पाहात असल्याचे ज्येष्ठ लाेक सांगत आहेत.
खरिपात पेरल्यानंतर रब्बीच्या हंगामात फुलोरा व शेंगा येणारा देशी पावटा हे पीक आहे. विभागातील डोंगर आणि सपाटीच्या भागात पाणी न सोडता केवळ थंडी आणि पहाटे पडणाऱ्या दवावर येणाऱ्या देशी पावट्याला खूप मागणी असते. किलोचा दर दोनशे रुपयांवरही पोहचतो. मुंबईकर गावी आल्यावर किलोत पावट्याच्या शेंगाची खरेदी करतात. गावाकडूनही मुंबई किंवा बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील मंडळींना, पै - पाहुण्यांना हिरवा व कोवळा चवदार पावटा पाठवला जातो. या शेंगांना विशिष्ट असा गंध असतो, जो आख्ख्या शिवारात दरवळतो. या काळात शेतात चुलीवर बनवल्या जाणाऱ्या पावटे भाताच्या पार्ट्याही ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहेत. साधारणपणे शेतात बांधाच्या बाजूला किंवा परड्यात, कुंपणावर पावट्याचे पीक घेतले जाते. यंदा पोषक वातावरणाची साथ मिळाल्याने विभागातील शेतकऱ्यांना देशी पावट्याचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
मध्यंतरी थोडाफार किडीचा प्रादुर्भाव दिसला; परंतु शेतकऱ्यांनी फवारणी व इतर उपाययोजना करून तो वेळीच नियंत्रणात आणला. हंगाम संपत आल्याने आता शेंगा वाळायला सुरुवात झाली आहे. शेतकरी स्वतः आणि मजूर लावून शेंगा तोडणी करत आहेत. वाळलेल्या शेंगा चोपून पावट्याची वाळवणे उन्हाला घातल्याचेही दिसून येते. गेल्या कित्येक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले पावट्याचे पीक प्रथमच पाहात असल्याचे गावातील ज्येष्ठ लाेक सांगत आहेत. पायलीत पिकणारा पावटा यंदा पोत्यात मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
--------
(कोट)
--------------
या विभागात पावट्याच्या देशी वाणाला शेतकऱ्यांची पसंती आहे. सहा महिन्यांचे हे पीक आहे, यंदा पाऊसमान, थंडी, आर्द्रता असे पोषक वातावरण जुळून आल्याने उत्पादन कितीतरी पटीने वाढले आहे.
- अर्जुन पवार,
सहायक कृषी अधिकारी, भोसगाव
B08055
ढेबेवाडी : शेतातून तोडून आणलेल्या पावट्याच्या शेंगाची वाळवणे प्रथमच नजरेस पडत आहेत.
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

