

पुणे, ता. २२ ः भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) संचालक व कुलगुरू धीरज सिंह यांच्याकडे आता राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने या संदर्भातील आदेश दिला आहे.
‘एनएफडीसी’च्या नियमित व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, सिंह यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे. दरम्यान, ‘एनएफडीसी’चे यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच हा बदल करण्यात आला आहे. मात्र, या बदलामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
‘एनएफडीसी’ ही देशातील चित्रपटविषयक महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. पुण्यातील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांच्यासह फिल्म्स डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया या चार संस्थांचे कामकाज १ जानेवारी २०२३ पासून ‘एनएफडीसी’मध्ये विलीन करण्यात आले. त्यामुळे चित्रपट निर्मिती, माहितीपट, चित्रपट महोत्सवांचे आयोजन, बालचित्रपटांना प्रोत्साहन आणि चित्रपट वारशाचे जतन अशा विविध क्षेत्रांतील कामकाजाची व्याप्ती या महामंडळाच्या अखत्यारीत येते.
‘एफटीआयआय’मधील शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच आता हा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सिंह यांच्यावर आहे. यंदाचा ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणार आहे. महोत्सवाच्या आयोजनात ‘एनएफडीसी’ची महत्त्वाची भूमिका असल्याने, कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे ‘इफ्फी’चे आयोजन हे पहिले मोठे आव्हान असेल.
धीरज सिंह हे १९९५ च्या तुकडीचे भारतीय माहिती सेवा (आयआयएस) अधिकारी आहेत. ‘नॅशनल मीडिया सेंटर’मध्ये भारतीय माहिती सेवेत अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिलेल्या सिंह यांना सरकारी जनसंपर्क आणि माध्यम व्यवस्थापनाचा २८ वर्षांहून अधिक अनुभव आहे. पत्र सूचना कार्यालयांमधील (पीआयबी) कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती सचिवालय तसेच आरोग्य आणि वाणिज्य यांसह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांसाठी प्रसार माध्यम आणि संपर्क हा विभाग हाताळला आहे. त्यांची ‘मॉडर्न मास्टर्स ऑफ सिनेमा’, ‘मॉडर्न मास्टर्स ऑफ म्युझिक, पेंटिंग, टेलिव्हिजन अँड लिटरेचर’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
फोटो ः 61005
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.