

बंदुकीतून छरा उडवून जीवे मारण्याची धमकी
धोंडेवाडीतील प्रकार; पोलिसात सहा जणांवर गुन्हा नोंद
कऱ्हाड, ता. १३ ः शेतातील किरकोळ कारणावरून बंदुकीतून छरा चालवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे घडली. याप्रकरणी धनाजी पोपट पाटील (वय ३६, रा. धोंडेवाडी) यानी फिर्याद दिली आहे. त्यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला.
जगन्नाथ रामचंद्र पाटील, भीमराव आबा खबाले, छाया जगन्नाथ पाटील, सुनंदा जालिंदर पाटील, रघुनाथ रामचंद्र पाटील, जयश्री रघुनाथ पाटील (सर्व रा. धोंडेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी; धनाजी पाटील यांच्या शेतातील शेतीपंपाची मोटरची वायर तोडण्यात आली होती. ती वायर जोडत असताना जगन्नाथ पाटील यांनी त्यांना वायर जोडलीस तर जीवे मारीन, अशी धमकी दिली. धनाजी पाटील यांनी त्याची माहिती वडिलांना देऊन वडील तेथे आल्यावर त्यांनी मोटरची वायर जोडली. धनाजी पाटील हे दुपारी शेतात पाणी पाजत असताना तेथे जगन्नाथ पाटील हे छऱ्याची बंदूक घेऊन गेले. त्यादरम्यान जगन्नाथ पाटील यांनी थोड्या अंतरावर छरा झाडून तेथून निघून गेले. त्याची माहिती धनाजी पाटील यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा जगन्नाथ पाटील यांनी धनाजी पाटील ज्या शेतात होते तेथे जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यादरम्यान तेथे भीमराव खबाले हे आले होते. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर छाया पाटील, सुनंदा पाटील, रघुनाथ पाटील, जयश्री पाटील यांनी एकत्र येऊन धनाजी पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यादरम्यान, पोलिसांनी जगन्नाथ पाटील व भीमराव खबाले यांना शस्त्रासह ताब्यात घेतले. त्याप्रकरणी धनाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास करत आहेत.
.....................