बंगळूर, ‘ध्रुव एनजी’चे पहिले उड्डाण
14489
बंगळूर ः स्वदेशी निर्मित ‘ध्रुव एनजी’ हेलिकॉप्टर आपले पहिले उड्डाण करताना.
............................
स्वदेशी ‘ध्रुव’चे पहिले उड्डाण यशस्वी
हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा उपक्रम, भारताने गाठला ऐतिहासिक टप्पा
बंगळूर, ता. ३० : देशाने एरोस्पेस उत्पादनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, आयात हलक्या दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टरला पर्याय म्हणून विकसित केलेल्या ‘ध्रुव एनजी’ या बहुउद्देशीय नागरी हेलिकॉप्टरने मंगळवारी (ता. ३०) पहिले यशस्वी उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी ‘ध्रुव एनजी’ला देशाच्या वाढत्या क्षमतेचे, आत्मविश्वासाचे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे प्रतीक असल्याचे म्हटले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन व निर्माण केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आरामावर विशेष भर दिला आहे. जागतिक दर्जाचे प्रमाणित ग्लास कॉकपिट, अत्याधुनिक एव्हियोनिक्स सूट आणि उत्कृष्ट परिस्थितीविषयक जागरूकता ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
५.५ टन वजनाचे ‘ध्रुव एनजी’ हे हलके दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टर आहे. भारतातील विविध आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितींमध्ये पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी त्याचे डिझाईन केले आहे. तसेच जागतिक नागरी विमान वाहतूक बाजारातील निकष काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी त्यात विशेष सुधारणा केल्या गेल्या आहेत. पहिल्या उड्डाणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नायडू म्हणाले, ‘‘भारतीय विमान वाहतूक इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. या यशासाठी ‘एचएएल’मधील डिझायनर, अभियंते, तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. एचएएल आता केवळ संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक या दोन्ही क्षेत्रांत समतोल प्रगती करत आहे. अपेक्षेपेक्षा लवकर पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल समाधान वाटले. भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत पुढील १० ते १५ वर्षांत देशात १,००० हून अधिक हेलिकॉप्टर कार्यरत होतील.’’
उड्डाणापूर्वी त्यांनी वैमानिकांसोबत कॉकपिटमध्ये जाऊन हेलिकॉप्टरच्या प्रगत प्रणालींची प्रत्यक्ष माहिती घेतली. स्वदेशी ‘शक्ती’ इंजिनला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) टाइप प्रमाणपत्र मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
असे आहे हेलिकॉप्टर
एचएएल अधिकाऱ्यांनी दिल्या माहितीनुसार, ‘ध्रुव एनजी’मध्ये दोन स्वदेशी ‘शक्ती १एच१सी’ इंजिन आहे. सुरक्षिततेसाठी अपघात-प्रतिरोधक आसने (सीट), सेल्फ-सीलिंग इंधन टाक्या आणि सिद्ध दुहेरी-इंजिन प्रणाली आहे. आरामदायक प्रवासासाठी प्रगत कंपन नियंत्रण प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ७.३३ घनमीटर क्षमतेची लवचिक केबिन आहे. व्हीआयपी वाहतुकीसाठी आलिशान सुविधांसह चार ते सहा प्रवाशांना नेता येते. तर कमाल १४ प्रवाशांची क्षमता आहे. एअर अॅम्ब्युलन्स भूमिकेत डॉक्टर व परिचारकासह चार स्ट्रेचरसाठीची व्यवस्थाही यामध्ये करता येते. सागरी कार्ये, कायदा अंमलबजावणी, शोध व बचाव कार्यासाठीही हे हेलिकॉप्टर उपयुक्त आहे.
---------
‘ध्रुव एनजी’ची वैशिष्ट्ये
-५.५ टन वजन
-२८५ किमी प्रतितास कमाल वेग
- ६३० किमीची रेंज
- पेलोड सुमारे १,००० किलो
- ३ तास ४० मिनिटांची उड्डाण क्षमता
- १४ प्रवाशांची क्षमता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

