

कोयनेत आता डिजिटल भूकंपमापन यंत्रणा
सिस्मोग्राफसह चार ॲक्सेलरोग्राफद्वारे धरणाच्या हालचालींचीही होणार नोंद
सूर्यकांत पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
पाटण, ता. २ ः महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सिंचन आणि वीज या गरजांसाठी महत्त्वाच्या कोयना प्रकल्पातील भूकंपमापन यंत्रणा गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहे. १ मे २०२६ पासून तांत्रिक बिघाडामुळे कोयनानगर येथील स्थानिक भूकंपमापन यंत्रणा बंद आहे. आता ही यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्यासाठी डिजिटल उपकरणे बसविण्यात येणार आहेत.
नव्या यंत्रणेत एक सिस्मोग्राफ आणि चार स्ट्राँग मोशन ॲक्सेलरोग्राफ बसविण्यात येणार आहेत. सिस्मोग्राफद्वारे भूकंपाची वेळ, तीव्रता व जमिनीतील कंपनांची नोंद होईल, तर चार ॲक्सेलरोग्राफद्वारे भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणाच्या बांधकामात निर्माण झालेली हालचाल व कंपन मोजता येणार आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रकल्पातील पाच भूकंपमापन यंत्रांपैकी चार यंत्रे यापूर्वीच बंद होती. त्यानंतर शेवटचे कार्यरत यंत्रही १ मे रोजी बंद पडले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कोयना परिसरात एका रात्रीत २.१ ते २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे पाच सौम्य धक्के जाणवले; मात्र स्थानिक यंत्रणा बंद असल्याने त्यांची अचूक नोंद कोयनानगर येथे होऊ शकली नाही. या भूकंपांच्या नोंदी सातारा भूकंप वेधशाळेत झाल्यानंतर कोयनेतील यंत्रणा बंद असल्याचे स्पष्ट झाले.
कोयना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १९६२ नंतर एमईक्यू-८०००० प्रकारची पाच ॲनालॉग यंत्रे बसविली होती. १९९३ पासून या परिसरातील भूकंपांची सातत्याने नोंद ठेवली जात होती. कोयना परिसरात आजपर्यंत लाखो भूकंपांची नोंद झाल्याने हे क्षेत्र महाराष्ट्रातील महत्त्वाचे भूकंपप्रवण क्षेत्र मानले जाते.
महिनाभरात यंत्रणा कार्यान्वित
मेरी, नाशिक येथील कंपनीकडे डिजिटल यंत्रणेसाठी मागणी करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपकरणे मिळताच कोयनानगर वेधशाळेत ती बसविण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
..........
कोट
.............
डिजिटल मशिन मिळण्यासाठी मेरी, नाशिक कार्यालयांकडे मागणी केली आहे. उपकरण प्राप्त होताच कोयनानगर वेधशाळेत बसविण्यात येईल. त्यातून अचूक भूकंपाची नोंद घेणे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित करणे शक्य होईल.
- किरण कानुगडे,
उपविभागीय अधिकारी, उपकरण उपविभाग, कोयनानगर
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.