जयकर बंगल्यात डिजिटल लायब्ररी

प्रसाद पाठक
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे - विधी महाविद्यालय रस्त्यावरचा बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा बंगला. ब्रिटिशकालीन (ट्यूडर स्ट्रक्‍चर) वास्तुशैलीतल्या या बंगल्यात एकेकाळी सिनेतारकांचे वसतिगृह होते. गेली काही वर्षे बंद असलेली ही ऐतिहासिक वास्तू आता चेहरामोहराच बदलून समोर येत आहे. चित्रपट संशोधकांसाठी डिजिटल लायब्ररी येथे सुरू होत आहे. 

पुणे - विधी महाविद्यालय रस्त्यावरचा बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा बंगला. ब्रिटिशकालीन (ट्यूडर स्ट्रक्‍चर) वास्तुशैलीतल्या या बंगल्यात एकेकाळी सिनेतारकांचे वसतिगृह होते. गेली काही वर्षे बंद असलेली ही ऐतिहासिक वास्तू आता चेहरामोहराच बदलून समोर येत आहे. चित्रपट संशोधकांसाठी डिजिटल लायब्ररी येथे सुरू होत आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर यांच्या या बंगल्याची मालकी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे आहे. याच वास्तूत बॅरिस्टर जयकर १९४७-५६ दरम्यान वास्तव्यास होते. ऐतिहासिक वास्तू (हेरिटेज बिल्डिंग) मध्ये नोंद असलेल्या या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे चार कोटी रुपये निधी संग्रहालयास मिळाला. बंगल्याच्या मूळच्या रचनेप्रमाणेच नूतनीकरण करण्यात येत असून, ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. लाकडी कलाकुसर हे या बंगल्याचे खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण छताचे बांधकाम लाकडात केले आहे.   हा बंगला काही काळ मुलींच्या वसतिगृहासाठी दिला होता. त्या वेळी जया भादुरी, शबाना आझमी, रेहाना सुलतान यांच्यासारख्या सिनेतारकादेखील तेथे वास्तव्याला होत्या. बंगल्यात पूर्वी ‘एफटीआयआय’च्या संचालकांचेही कार्यालय होते.

ही ऐतिहासिक वास्तू वापरात राहावी यासाठी बंगल्याच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. डिजिटल लायब्ररीत, साँग बुक्‍स, लॉबीकार्डस्‌, दुर्मीळ छायाचित्रे, पंधरा हजारांहून अधिक पोस्टर्स, २५ ते ३० हजार चित्रपटांच्या संहितांचे डिजिटायझेशन, फिल्म फेअर, फिल्म इंडिया यांसारख्या दुर्मीळ मासिकाचे व जर्नलचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, संशोधकांसाठी ही लायब्ररी उपयुक्त ठरेल.’’
- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

संशोधकांसाठी सुविधा
बंगल्याच्या वरच्या मजल्यावर निवांतपणे संशोधकांना एखादा चित्रपट पाहण्याचीसुद्धा व्यवस्था असेल. बंगल्यात प्रवेश केल्यावर बॅ. जयकर यांच्या छायाचित्रासहित त्यांच्या जीवनचरित्रावरील माहितीफलकही पाहायला मिळेल. बंगल्याच्या मागच्या जागेचा वापरही चित्रपटविषयक गप्पागोष्टी करण्यासाठी करण्याचा विचार आहे. वसतिगृहात राहिलेल्या अभिनेत्रींकडूनही त्यांचे बंगल्याविषयीचे अनुभव मागविले आहेत.

Web Title: digital library in jaykar bunglow