

फायनल
---------------------------------
कर्जाचा भस्मासुर आणि झटपट श्रीमंतीचे मृगजळ
----------------
साडेतीनशे वर्षांपूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटणीची सावकारी कर्जखते इंद्रायणीच्या डोहात बुडवून सामान्य माणसाला पाशातून मुक्त केले होते. आज त्याच महाराष्ट्रात आधुनिक सावकारांनी थेट तरुणांच्या खिशात आणि तळहातातील मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. इंद्रायणीत बुडवलेली ती कर्जखते आज डिजिटल ॲप्स, क्रेडिट कार्डस् आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या लाल-हिरव्या आकड्यांच्या रूपाने पुन्हा जिवंत झाली आहेत.
-------------------
अमोल साळे
------------------
पश्चिम महाराष्ट्रातील एका खेड्यात राहणारा गजानन नावाचा तरुण शेतकरी. वडिलोपार्जित तीन एकर बागायती शेती आणि जोडीला चार संकरित गाईंचा गोठा सांभाळत तो संसाराचा गाडा ओढत होता. अंगात कष्ट करण्याची धमक, गावात प्रामाणिक माणूस म्हणून लौकिक आणि शेती-दुग्ध व्यवसायातून मिळणारा स्थिर नफा, यामुळे त्याचे कुटुंब सुखासमाधानाने जगत होते. पण दोन वर्षांपूर्वी एका क्षुल्लक मोहाने त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले.
गावातील दूध डेअरीवर बसलेल्या काही समवयस्क मित्रांकडून त्याला मोबाइलवर अवघ्या पाच मिनिटांत झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सची माहिती मिळाली. गजाननच्या मनात बऱ्याच दिवसांपासून एक महागडा स्मार्टफोन घेण्याची सुप्त इच्छा होती. ‘कशाला शेतीचे कष्टाचे पैसे मोडायचे? ॲपवरून कर्ज काढू आणि फोन घेऊ,’ असा सोईस्कर विचार करून त्याने ते ॲप डाउनलोड केले. इंग्रजीतील किचकट अटी-शर्ती न वाचताच त्याने मोबाइलमधील फोटो आणि संपर्क यादी वापरण्याची परवानगी दिली. क्षणात त्याच्या खात्यात वीस हजार रुपये जमा झाले.
नव्या फोनचा आनंद अवघे काही दिवसच टिकला. दुसऱ्या महिन्यापासून परतफेडीसाठी अनोळखी क्रमांकांवरून धमक्यांचे फोन सुरू झाले. वीस हजारांच्या कर्जावर दरमहा १० ते १५ टक्के अवाजवी व्याज आकारले जात होते. निसर्गानेही दगा दिला; अवकाळी पावसाने कांद्याची पात मातीत मिसळली आणि दुधाचे दरही घसरले. हप्ता चुकला आणि सुरू झाला असह्य मानसिक छळ. ॲप कंपन्यांच्या वसुली गुंडांनी गजाननच्या मोबाइलमधील संपर्कांवर फोन करून ‘गजानन चोर आहे’ असे संदेश धाडले. एवढेच नव्हे, तर घरातील महिलांचे फोटो मॉर्फ करून नातेवाइकांना पाठवण्याची उघड धमकी दिली.
या विळख्यातून सुटण्यासाठी गजाननने मित्राच्या सल्ल्याने शेअर बाजारातील ‘ऑप्शन्स ट्रेडिंग’चा (F&O) सट्टा सुरू केला. ‘रोज सकाळी अर्धा तास काम कर, दोन हजार सहज मिळतील; सगळे कर्ज आठ दिवसांत फिटेल!’ या भूलथापांना भुलून गजाननने खासगी सावकाराकडून दरमहा पाच टक्के व्याजाने एक लाख रुपये काढले आणि ट्रेडिंगमध्ये ओतले. सुरुवातीला दोन दिवसांत चार हजार रुपये मिळाले, पण तिसऱ्या दिवशी बाजाराच्या एका मोठ्या झटक्यात त्याचे सव्वा लाख रुपये अवघ्या दहा मिनिटांत भस्मसात झाले.
आज गजाननच्या दारात सावकार आणि वसुली एजंट्स उभे आहेत. घरात रोजची धुसफूस, मुलांच्या शाळेची थकलेली फी आणि आत्मसन्मान धुळीस मिळालेली स्थिती आहे.
गजाननची ही गोष्ट प्रातिनिधिक आहे; पण ती आजच्या महाराष्ट्राच्या छातीवर पडलेला खोल घाव आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटणीची सावकारी कर्जखते इंद्रायणीच्या डोहात बुडवून सामान्य माणसाला पाशातून मुक्त केले होते. आज त्याच महाराष्ट्रात आधुनिक सावकारांनी थेट तरुणांच्या खिशात आणि तळहातातील मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. इंद्रायणीत बुडवलेली ती कर्जखते आज डिजिटल ॲप्स, क्रेडिट कार्डस् आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या लाल-हिरव्या आकड्यांच्या रूपाने पुन्हा जिवंत झाली आहेत.
उपभोगवादी संस्कृती आणि कर्जाचा महापूर
आपल्या संस्कृतीत ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ हा केवळ वाक्प्रचार नव्हता, तर तो पिढ्यान् पिढ्यांच्या संसाराचा जीवनमंत्र होता. आधी घाम गाळायचा, घामातून बचत करायची आणि बचतीतून सण-उत्सव साजरे करायचे, ही आपली अस्सल मातीची शिस्त होती. पण गेल्या एका दशकात मॉल संस्कृतीने, टीव्हीच्या जाहिरातींनी आणि हातातल्या स्मार्ट स्क्रीनने ही मूल्यव्यवस्था मुळापासून उखडून फेकली आहे. आजचा नवा मंत्र बनला आहे: ‘आधी वस्तू उपभोगा, आयुष्यभर हप्ते भरा!’ (Buy Now, Pay Later)
दीडशे वर्षांपूर्वी महात्मा जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथात ज्या सावकारी आणि व्यापारी शोषणावर कोरडे ओढले होते, त्याचेच रूप आज आधुनिक अल्गोरिदम, डिजिटल बँकिंग आणि क्रेडिट कार्डसच्या रूपाने अवतरले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय कुटुंबांवरील एकूण कर्जाचा बोजा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) तब्बल ४२.९ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. त्याच वेळी, भारतीयांची निव्वळ कौटुंबिक आर्थिक बचत ही गेल्या चार दशकांतील नीचांकी पातळीवर (GDP च्या अवघ्या ५.३ टक्क्यांवर) घसरली आहे. संकट काळासाठीची आपली शिदोरी संपत चालली आहे आणि उसन्या पैशांचा डोंगर आभाळाला भिडत आहे.
या संकटाचे पदर किती खोलवर पसरले आहेत, हे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते :
● ग्रामीण भागावर विळखा :
‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या (TransUnion CIBIL) अहवालानुसार, देशात वाटल्या जाणाऱ्या एकूण नवीन रिटेल कर्जांपैकी तब्बल ६० टक्के कर्जे ही निमशहरी आणि ग्रामीण भागांतील ग्राहकांना दिली जात आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांनी आता खेड्यापाड्यांतील तरुणांना लक्ष्य केले आहे.
● असुरक्षित कर्जांचा धोका :
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, बँकांच्या एकूण नवीन बुडीत कर्जांमध्ये तब्बल ५१.९ टक्के वाटा हा विनातारण वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्डसचा आहे. विशेषतः दहा हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या छोट्या कर्जांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक (५.४ टक्के) आहे.
● क्रेडिट कार्डसची भुरळ :
देशात क्रेडिट कार्डसची संख्या १० कोटींच्या पुढे गेली असून, त्यावरील एकूण थकीत कर्जाचा आकडा २ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या पार गेला आहे. वार्षिक ३६ टक्के ते ४५ टक्के व्याजदर असलेल्या या कार्डांचा वापर आता छोट्या तालुक्यांतही प्रतिष्ठेचे लक्षण बनला आहे.
● मायक्रोफायनान्सचा ताण :
देशातील मायक्रोफायनान्स क्षेत्राचा कर्ज पोर्टफोलिओ ४ लाख ८५ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असून, १५ कोटींहून अधिक सक्रिय कर्ज खाती आहेत. ग्रामीण भागात महिला बचत गटांमार्फत एका संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या संस्थेकडून कर्ज घेण्याचे दुष्टचक्र सुरू झाले आहे.
● खर्चाच्या बदललेल्या सवयी :
कौटुंबिक खर्च पाहणी अहवालानुसार (HCES), ग्रामीण कुटुंबांचा ५३ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च आता अन्न-धान्य व्यतिरिक्त वस्तूंवर होत आहे. स्मार्टफोन, महागड्या दुचाकी आणि देखाव्यावर होणारा खर्च वाढला आहे.
● आरोग्य महागाईचा मारा :
भारतात वैद्यकीय महागाईचा दर १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक आहे. अचानक उद्भविणारे आजारपण कुटुंबांना थेट कर्जाच्या खाईत लोटते.
‘मार्सेलस’च्या अभ्यासानुसार, देशातील सुमारे ५ ते १० टक्के मध्यमवर्गीय कुटुंबे कर्जाच्या गंभीर सापळ्यात (Debt Trap) अडकली आहेत. लोकांचे वास्तव उत्पन्न स्थिर राहिले, पण जीवनशैलीचा खर्च कर्जाच्या आधारावर दुपटीने वाढला. यातून कोणतीही उत्पादनक्षम संपत्ती निर्माण होत नसून, केवळ एक भ्रामक समृद्धी उभी केली जात आहे.
जागतिक इतिहासातील धडे
कर्ज काढून उपभोग घेण्याची ही चटक समाजाला कशी विनाशाकडे नेते, याची ज्वलंत उदाहरणे जागतिक इतिहासात ठळकपणे नोंदविलेली आहेत.
दक्षिण कोरियाचे क्रेडिट कार्ड संकट (२००३)
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिण कोरियाने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ग्राहकांना सुलभ कर्ज आणि क्रेडिट कार्डस् वाटण्यास प्रोत्साहन दिले. बँकांनी रस्त्यांवर स्टॉल्स लावून, कोणतीही पत न तपासता प्रत्येकाला चार-पाच क्रेडिट कार्डस् वाटली. लोकांनी त्या उसन्या पैशांतून चैनीचे आयुष्य जगायला सुरुवात केली. अवघ्या चार वर्षांत हा फुगा फुटला. २००३ पर्यंत दक्षिण कोरियातील दर १३ प्रौढ व्यक्तींमागे एक व्यक्ती दिवाळखोर झाली होती. हजारो लोकांनी कर्जापायी आत्महत्या केल्या आणि देशातील सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड कंपनी ‘एलजी कार्ड’ दिवाळखोरीत निघाल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर आली.
अमेरिकेचे २००८ चे सबप्राइम संकट
अमेरिकेत परतफेडीची क्षमता नसलेल्या लोकांना बँकांनी भरमसाट गृहकर्जे वाटली. लोकांनी एका घरावर दुसरे कर्ज काढून चैनीच्या वस्तू खरेदी केल्या. २००७-०८ मध्ये जेव्हा हप्ते थकले, तेव्हा मातब्बर बँका एकापाठोपाठ कोसळल्या. लाखो लोकांची घरे जप्त झाली, कोट्यवधी नोकऱ्या गेल्या आणि संपूर्ण जग एका भीषण मंदीच्या खाईत लोटले गेले.
निसर्गाचा नियम असो वा अर्थशास्त्राचा, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च जर उसन्या पैशांवर केला, तर त्याचा शेवट सामाजिक पतनातच होतो, हाच इतिहास सांगतो.
दलदलीतून विहिरीत उडी
जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाच्या विळख्यात अडकते, तेव्हा तिच्यासमोर दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे संयम बाळगून, अनावश्यक खर्च पूर्णपणे थांबवून, घाम गाळून हळूहळू कर्ज फेडणे. हा मार्ग कठीण आणि वेळखाऊ असतो. दुसरा मार्ग असतो : ‘झटपट श्रीमंत होण्याचा शॉर्टकट.’
हताश झालेल्या माणसाला कोणीतरी येऊन सांगते, ‘कशाला शेतात किंवा नोकरीत राबतोस? मोबाइलवर दोन बटणे दाबून एका रात्रीत श्रीमंत होता येते!’ कर्जाच्या सापळ्यातून सुटण्यासाठी माणूस या मोहाला बळी पडतो आणि दलदलीतून निघण्याच्या नादात थेट विहिरीत उडी घेतो. हे शॉर्टकट्स प्रामुख्याने तीन घातक रूपांत पसरले आहेत : शेअर बाजारातील F&O ट्रेडिंग, बेकायदेशीर फॉरेक्स/क्रिप्टो ॲप्स आणि पॉन्झी साखळी योजना.
सेबीचा आरसा
शेअर बाजारात चांगल्या, दर्जेदार कंपन्यांचे शेअर्स अभ्यासपूर्वक घेऊन ते अनेक वर्षे टिकवून ठेवणे (दीर्घकालीन गुंतवणूक) आणि रोज सकाळी मोबाइलवर पडणाऱ्या भावांवर पैजा लावणे (F&O ट्रेडिंग) या दोन टोकाच्या वेगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने, आज ग्रामीण भागातील तरुणांच्या मनात ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजार असा गैरसमज पसरवला गेला आहे.
वॉरन बफे यांनी डेरिव्हेटिव्ह्ज (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) यांना ‘आर्थिक महासंहारक अस्त्रे’ (Financial Weapons of Mass Destruction) म्हटले आहे. भारतीय भांडवली बाजार नियामक मंडळाने (SEBI) प्रसिद्ध केलेले अहवाल या विधानाची भीषणता स्पष्ट करतात :
● १० पैकी ९ जण तोट्यात
इक्विटी F&O मध्ये व्यवहार करणाऱ्या तब्बल ९३ टक्के किरकोळ ट्रेडर्सना निव्वळ तोटाच झाला आहे.
● अडीच लाख कोटींची राखरांगोळी
गेल्या काही वर्षांत १ कोटींहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांनी मिळून तब्बल लाख ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमावली आहे. हा पैसा सामान्य कुटुंबांच्या शेतीचा, घामाचा आणि बचतीचा होता.
● वार्षिक सरासरी नुकसान
तोटा करणाऱ्या प्रत्येक सामान्य ट्रेडरला दरवर्षी सरासरी १ लाख २० हजार रुपयांचा फटका बसला आहे. याउलट, १ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा कमावणारे गुंतवणूकदार अवघे १ टक्का होते.
● ग्रामीण तरुणांची होरपळ
ट्रेडिंग करणाऱ्या एकूण लोकांपैकी तब्बल ७२ टक्के ट्रेडर्स हे देशातील पहिल्या ३० मोठ्या शहरांच्या बाहेरील (B-30), म्हणजेच निमशहरी व ग्रामीण भागातील आहेत. ट्रेडिंग करणाऱ्यांपैकी ४३ टक्के ट्रेडर्स हे ३० वर्षांखालील तरुण असून, त्यातील ९३ टक्के तरुण तोट्यात आहेत. तसेच ७५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
● दलालीचा भुर्दंड
तोटा झाला तरी ब्रोकरेज आणि सरकारी कर भरावेच लागतात. ट्रेडर्सनी गेल्या काही वर्षांत १ लाख कोटी रुपयांच्या घरात व्यवहार शुल्क मोजले आहे, ज्यातील मोठा वाटा ब्रोकरेज कंपन्यांच्या खिशात गेला.
F&O ट्रेडिंग हा ‘शून्य योग खेळ’ (Zero-Sum Game) आहे. एकाचा खिसा कापला जातो, तेव्हाच दुसऱ्याच्या खिशात पैसा जातो. एका बाजूला शेताच्या बांधावर किंवा चहाच्या टपरीवर नेटवर्क शोधत बसलेला खेड्यातील तरुण; तर दुसऱ्या बाजूला सेकंदाच्या सहस्रांशात निर्णय घेणारे सुपर कॉम्प्युटर्स, उच्च दर्जाचे अल्गोरिदम आणि बाजाराच्या मुख्य सर्व्हरजवळ बसलेल्या बलाढ्य संस्थात्मक कंपन्या, असा हा विषम खेळ आहे. मोठ्या संस्थांचा ९६ टक्के ते ९७ टक्के नफा हा याच अल्गोरिदम प्रणालीतून येतो. अशा असमान युद्धात सामान्य माणूस टिकणे अशक्य आहे.
फॉरेक्स, क्रिप्टो आणि साखळी योजनांचे (MLM) मायाजाल
ऑप्शन्स ट्रेडिंगनंतर आजचा तरुण ज्या दुसऱ्या मोठ्या सापळ्यात अडकतो आहे, तो म्हणजे ‘अवैध फॉरेक्स ट्रेडिंग.’
सोशल मीडियावर ‘घरी बसून डॉलर कमवा’, ‘दहा डॉलर टाका आणि पाचशे डॉलर मिळवा’ अशा खोट्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. अनेक विदेशी ॲप्स १०० पट ते ४०० पट लिव्हरेज (उसनवारी) देऊन सट्टा खेळायला लावतात. रिझर्व्ह बँकेने वारंवार अशा बेकायदेशीर प्लॅटफॉर्म्सची ‘सतर्कता यादी’ (Alert List) जाहीर केली आहे. हे व्यवहार फेमा (FEMA) कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. सुरुवातीला नफा झाल्याचे आभासी आकडे दाखवले जातात; पण जेव्हा माणूस प्रत्यक्ष पैसे काढायला जातो, तेव्हा त्याचे खाते गोठवले जाते.
तिसरा अत्यंत जुना आणि ग्रामीण भागात खोलवर रुजलेला प्रकार म्हणजे मल्टिलेव्हल मार्केटिंग (MLM) आणि पॉन्झी साखळी योजना. गावागावांत दर काही महिन्यांनी एक नवीन योजना अवतरते. कधी ‘शेळीपालन आणि कुक्कुटपालन गुंतवणूक योजना’, कधी ‘दुग्ध व्यवसाय भागीदारी’, तर कधी ‘जादुई प्रॉडक्ट्स किंवा डिजिटल टोकन’. ‘तुम्ही ५० हजार भरा, दोन माणसे जोडा, त्यांनी पुढे दोन जोडले, की घरी बसून महिना वीस हजार मिळवा!’ हे या योजनांचे साधे सूत्र असते.
सुरुवातीला काही महिने जुन्या लोकांना नव्या लोकांच्या पैशांतून परतावा दिला जातो. शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक यात पैसे गुंतवतात आणि इतरांना गळ घालतात. जेव्हा नवीन लोकांचे पैसे येणे बंद होते, तेव्हा कंपनीचा सूत्रधार शेकडो कोटी रुपये घेऊन रातोरात पसार होतो. या योजनांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर गावातील पिढ्यान् पिढ्यांचा सामाजिक सलोखा, नातीगोती आणि मैत्री कायमची उद्ध्वस्त होते.
या जोडीला देशात ८ लाख २० हजार कोटी रुपयांचा अवैध ऑनलाइन सट्टेबाजीचा बाजार फोफावला असून, क्रिकेट बेटिंगच्या नावाने हा जुगार खेड्यापाड्यातील घरांपर्यंत पोहोचला आहे.
मोहाचे मानसशास्त्र
माणूस सतत तोटा होत असूनही या दलदलीतून बाहेर का पडू शकत नाही? यामागे मानवी मेंदूचे विज्ञान दडलेले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ''DSM-5'' मॅन्युअलनुसार, जुगाराचे व्यसन हे दारू किंवा अमली पदार्थांच्या व्यसनाइतकेच घातक मानले गेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मोबाइलवर ट्रेडिंग करते किंवा पैज लावते, तेव्हा मेंदूत ‘डोपामिन’ नावाचे रसायन स्रवते. हे डोपामिन क्षणिक रोमांच आणि उत्तेजना देते. जेव्हा पैज थोडक्यात चुकते, तेव्हा ‘पुढच्या वेळी नक्की जिंकणार!’ हा भ्रम निर्माण होतो, ज्याला मानसशास्त्रात ‘गॅम्बलर्स फॅलसी’ (Gambler''s Fallacy) म्हणतात. तसेच ‘आतापर्यंत दोन लाख गेलेच आहेत, ते भरून काढण्यासाठी अजून पन्नास हजार लावून बघू,’ या हट्टाला ‘सनक कॉस्ट फॅलसी’ (Sunk Cost Fallacy) म्हणतात.
या आगीत तेल ओतण्याचे काम सोशल मीडियावरील तथाकथित ‘फिनफ्लुएन्सर्स’ (Finfluencers) करत आहेत. भाड्याने घेतलेल्या लक्झरी गाड्यांसमोर उभे राहून, परदेश दौऱ्यांचे खोटे व्हिडिओ दाखवून हे लोक तरुणांना भुरळ पाडतात. स्वतः ट्रेडिंगमधून पैसे कमावण्याऐवजी, ते सामान्य तरुणांना महागडे कोर्सेस आणि टेलिग्राम कॉल्स विकून गब्बर होतात. प्रामाणिक कष्टाची थट्टा उडवणारी ही एक विकृती बनली आहे.
ग्रामीण महाराष्ट्रावरील सामाजिक घाव
कर्ज आणि सट्टेबाजीचा हा भस्मासुर केवळ कागदावरील आकड्यांपुरता मर्यादित नाही; त्याने महाराष्ट्राच्या मातीतील हजारो कुटुंबांची शांतता हिरावून घेतली आहे.
नाबार्डच्या ‘अखिल भारतीय ग्रामीण वित्तीय समावेशन सर्वेक्षणा’नुसार (NAFIS 2021-22), देशातील ५२ टक्के ग्रामीण कुटुंबे आणि तब्बल ५५.४ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी आहेत. या कर्जदार कुटुंबांपैकी २४.६ टक्के कुटुंबे आजही खासगी सावकार आणि अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहेत. बँकांमधील किचकट प्रक्रिया आणि उपभोग्य गरजांसाठी कर्ज न मिळणे यांमुळे शेतकरी आजही सावकाराच्या दारात जातो. हे सावकार दरमहा ३ ते १० टक्के (वार्षिक ३६ ते १२० टक्के किंवा अधिक) अवाजवी व्याज आकारतात.
याचे सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर आहेत :
● महिलांवर दुहेरी भार : कर्ज पुरुषाच्या नावे असले, तरी त्याचा सर्वाधिक जाच घरातील स्त्रियांना सहन करावा लागतो. मुलांचे शिक्षण थांबवणे, स्वतःचे मंगळसूत्र आणि दागिने सावकाराकडे गहाण ठेवणे आणि वसुलीवाल्यांचा अपमान सहन करत संसाराचा गाडा ओढणे ही महिलांची मूक वेदना बनली आहे.
● करपून जाणारी पुढची पिढी : घरात कर्जाचा ताण वाढला की त्याचा थेट फटका मुलांच्या शिक्षणाला बसतो. उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणारी मुले शाळा-कॉलेज सोडून मजुरी करू लागतात आणि गरिबीचे हे दुष्टचक्र पिढ्यान्पिढ्या चालू राहते.
● आत्महत्यांचे भीषण वास्तव : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (NCRB) अहवालानुसार, देशातील कृषी क्षेत्राशी निगडित एकूण आत्महत्यांपैकी सर्वाधिक, म्हणजेच सुमारे ३८ टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात (४,२४८ शेतकरी) नोंदविल्या गेल्या आहेत. यामागे केवळ हवामान बदल किंवा नापिकी हीच कारणे नाहीत; तर उपभोग्य वस्तूंसाठी घेतलेली खासगी कर्जे आणि सट्टेबाजीत झालेले नुकसान हेही एक मोठे छुपे कारण ठरत आहे.
मुक्तीचा मार्ग
या संकटाची व्याप्ती कितीही गंभीर असली, तरी योग्य दिशा आणि निर्धार असेल तर या चक्रव्यूहातून बाहेर पडणे निश्चितपणे शक्य आहे. यासाठी खालील व्यावहारिक पावले उचलली पाहिजेत :
१. ‘गरज’ आणि ‘हौस’ यातील फरक ओळखा :
आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या खर्चावर ताबा मिळवणे. नवीन मोबाइल, महागडी गाडी किंवा लग्नकार्यातील अवाजवी देखावा ही गरज नसून तात्पुरती हौस आहे. जेव्हा आपण स्वतःच्या कमाईपेक्षा कमी खर्च करायला शिकतो, तेव्हाच बचतीचा पाया रचला जातो.
२. कर्जाची पद्धतशीर परतफेड (Debt Payoff Strategy) :
डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, तर घाबरून न जाता त्याचे नियोजन करा. यासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात :
● अॅव्हलाँच पद्धत (Avalanche Method) :
ज्या कर्जाचा व्याजदर सर्वाधिक आहे (उदा. खासगी सावकार, क्रेडिट कार्ड, डिजिटल लोन ॲप्स), ते कर्ज सर्वांत आधी फेडण्यासाठी अतिरिक्त पैसे वापरा. गणितीदृष्ट्या यामुळे व्याजाचा भार वेगाने कमी होतो आणि एकूण खर्चात मोठी बचत होते.
● स्नोबॉल पद्धत (Snowball Method) :
ज्यांना मानसिक ताण कमी करायचा आहे आणि दिलासा हवा आहे, त्यांनी सर्वांत आधी सर्वांत लहान रकमेची कर्जे फेडून मोकळे व्हावे. यामुळे देण्यांची संख्या पटापट कमी होते आणि ‘आपण कर्जातून मुक्त होऊ शकतो’ असा आत्मविश्वास मिळतो.
● सोईची पद्धत निवडा :
या दोन्ही पद्धती आपापल्या जागी प्रभावी आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिक ताण सहन करण्याची क्षमता आणि प्राधान्यक्रम यानुसार जी पद्धत तुम्हाला अधिक सोईस्कर वाटते, ती तुम्ही निवडू शकता. मात्र जुने कर्ज फेडण्यासाठी दुसरे नवीन कर्ज काढण्याची घोडचूक कधीही करू नका.
३. आणीबाणी निधी आणि आरोग्य विमा :
संकट कधी सांगून येत नाही. घरातील आजारपणाचा खर्च माणसाला थेट सावकाराच्या दारात उभा करतो. म्हणूनच, प्रत्येकाने कुटुंबासाठी किमान पाच लाख रुपयांचे मूलभूत आरोग्य विमा कवच (Health Insurance) घेणे अनिवार्य आहे. तसेच किमान सहा महिन्यांच्या संसाराच्या खर्चाएवढी रक्कम बँकेच्या साध्या मुदत ठेवीत (FD) सुरक्षित ठेवावी.
४. कायदेशीर संरक्षण : दिवाळखोरी कायद्याची (IBC) मदत
आपल्या देशात ‘दिवाळखोरी आणि नादारी कायदा २०१६’ (Insolvency and Bankruptcy Code - IBC) अस्तित्वात आहे, ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. जर एखादी व्यक्ती कर्जाच्या अशा सापळ्यात अडकली असेल, की जिथून बाहेर पडणे अशक्य आहे, तर ती व्यक्ती कर्ज वसुली न्यायाधिकरणाकडे (DRT) कायदेशीर दाद मागू शकते.
● संरक्षण कालावधी (Moratorium):
अर्ज दाखल होताच कर्जदाराला कायदेशीर संरक्षण मिळते. याचा अर्थ वसुली एजंट्सचे फोन, धमक्या आणि जप्तीची कारवाई त्वरित थांबते.
● फ्रेश स्टार्ट प्रक्रिया (Fresh Start Process):
अत्यंत अल्प उत्पन्न (वार्षिक उत्पन्न ₹ ६०,००० पेक्षा कमी, मालमत्ता ₹ २०,००० पेक्षा कमी आणि एकूण कर्ज ₹ ३५,००० पेक्षा कमी) असलेल्या गरीब व्यक्तींची कर्जे या प्रक्रियेद्वारे कायदेशीररीत्या माफ केली जाऊ शकतात. बेकायदेशीरपणे ब्लॅकमेल करणाऱ्या लोन ॲप्सविरुद्ध तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.
शॉर्टकट बंद करा
जगातील कोणत्याही प्रामाणिक व्यवसायात रातोरात पैसे दुप्पट करण्याची ताकद नसते. संपत्तीची वाढ ही शेतातील पिकासारखी असते; तिला मशागत, खत-पाणी आणि वेळेची गरज असते.
● शेअर बाजारातील रोजचे सट्टेबाजीचे ट्रेडिंग पूर्णपणे बंद करा.
● सेबी मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाने चांगल्या म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Funds) पद्धतशीरपणे दरमहा छोटी बचत (SIP) सुरू करणे हा एक शाश्वत आणि सुरक्षित मार्ग आहे. म्युच्युअल फंड अनेक लोकांचे पैसे एकत्र करून देशातील चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवतात, ज्यामुळे जोखीम विभागली जाते. गुंतवणुकीला संयमाने किमान सात ते दहा वर्षांचा वेळ दिला, तरच चक्रवाढ वाढीचा लाभ मिळतो.
शेतीला जोडधंद्याची जोड आणि समुपदेशन
केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, स्थानिक पातळीवर विक्री व्यवस्था, कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय यांसारखे शाश्वत जोडधंदे उभारून कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे हाच खरा मार्ग आहे. तसेच ट्रेडिंग किंवा जुगाराचे व्यसन जडलेल्या व्यक्तीला अपराधी मानण्याऐवजी, तिला मानसोपचार आणि समुपदेशनाची गरज आहे हे कुटुंबाने ओळखले पाहिजे. जिल्हा रुग्णालयांमधील व्यसनमुक्ती केंद्रांचा वेळीच लाभ घ्यावा.
या दिवाळीत खऱ्या प्रकाशाचा शोध घेऊया
दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय. आपल्या संस्कृतीत दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते. आपल्या संतांनी सांगितले आहे, की लक्ष्मी ही कष्टाची, घामाची आणि चारित्र्याची दासी असते; ती कधीही सट्टेबाजीच्या आणि फसवणुकीच्या मार्गाने घरात स्थिर राहत नाही.
उसन्या पैशांवर फटाके फोडून आणि कर्जाच्या हप्त्यांवर महागड्या वस्तू आणून घरासमोर केलेली रोषणाई ही खरी समृद्धी नाही; तो केवळ काही तासांचा आभास असतो. फटाक्यांचा धूर विरून गेला की मागे उरतो तो केवळ कर्जाचा काळाकुट्ट अंधार.
या दिवाळीत आपण सर्वांनी एक नवा संकल्प करूया. उसन्या पैशांवर चालणाऱ्या खोट्या दिखाऊपणाला रामराम ठोकूया. मोबाइलच्या पडद्यावरील खोट्या ट्रेडिंग ॲप्स, फॉरेक्सचे आमिष आणि साखळी योजनांच्या मृगजळाला लाथाडून आपल्या घामावर, कष्टावर आणि संयमी बचतीवर विश्वास ठेवूया. कर्जाच्या बेड्या तोडून जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि भयमुक्त होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने घराघरांत समृद्धीची मंगल दीपमालिका प्रज्वलित होईल!
---------
(लेखक परिचय....)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.