सहकाराची बांधिलकी अन् शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नेतृत्व!

सहकाराची बांधिलकी अन् शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नेतृत्व!
Published on: 

सहकाराची बांधिलकी अन् शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नेतृत्व!

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा विचार करताना माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांचे योगदान अधोरेखित करावे लागेल. राजकारणाकडे केवळ सत्ता आणि पदाच्या माध्यमातून न पाहता, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी विकासकामांना प्राधान्य दिले. शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले काम त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे आहे.

- दत्ता बांगर,
उद्योजक, मुंबई/पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव)

आंबेगाव तालुका हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे. येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहणे आवश्यक आहे, ही भूमिका माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने मांडली. शेतीमाल प्रक्रिया उद्योग, दूध प्रक्रिया उद्योग, मसाला उद्योग आणि बटाटा साठवणुकीसाठी शीतगृह अशा विविध उद्योगांच्या उभारणीला त्यांनी प्रोत्साहन दिले. या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योगांचे नवे पर्याय निर्माण झाले. स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. हजारो तरुणांना आपल्या परिसरातच रोजगार मिळवून देणाऱ्या औद्योगिक विकासाला त्यांच्या प्रयत्नांनी चालना मिळाली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्यवर्धन मिळवून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, हा या प्रयत्नांचा महत्त्वाचा उद्देश राहिला आहे.
सहकार क्षेत्रातील माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि संचालक मंडळाने शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम हप्ता प्रति टन १७७ रुपये याप्रमाणे एकूण १५ कोटी ६३ लाख ३ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये अंतिम ऊसदर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना दिलेला शब्द दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात आला. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसा उपलब्ध करून देणे, त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे आणि सहकारातील विश्वास अधिक दृढ करणे, ही या निर्णयामागील महत्त्वाची भावना आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा देणे, ही नेतृत्वाची खरी कसोटी आहे.
मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासालाही दिलीप वळसे पाटील यांनी मोठी चालना दिली. काठापूर, पिंपळगाव, मंचर, चांडोली, अवसरी, पेठ, घोडेगाव, तळेघर, श्री क्षेत्र वडगाव काशिंबे तसेच शिरूरच्या ३९ गावांमध्ये वीज उपकेंद्रांची उभारणी करून शेती, उद्योग आणि व्यवसायांना नियमित वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. डिंभे धरणाचे उजवे व डावे कालवे, घोड आणि मीना नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गावोगावी नळ पाणीपुरवठा योजना आणि गाव तेथे डांबरी रस्ते या माध्यमातून ग्रामीण विकासाचा पाया मजबूत केला.
अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाची दारे खुली झाली. आदिवासी आश्रमशाळांच्या इमारती, घोडेगाव येथील न्यायालय व प्रशासकीय कार्यालये, मंचर आणि घोडेगाव पोलीस ठाण्यांच्या इमारती व पोलीस वसाहती तसेच मंचर येथील तांबे मळा एसटी आगार, अशा विविध सुविधांमुळे मतदारसंघाच्या विकासाला व्यापक स्वरूप मिळाले.
दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाची विशेषता म्हणजे विकासाचा विचार करताना शेतकरी, उद्योजक, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक या प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका. शेतीला उद्योगाची जोड, तरुणांच्या हाताला रोजगार, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि गावागावांत पायाभूत सुविधा पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे.
वाढदिवसानिमित्त दिलीप वळसे पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते की, विकासकामांचा व्यापक दृष्टिकोन, सहकाराची बांधिलकी आणि शेतकऱ्यांप्रति असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांनी जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. हा विकासाचा प्रवास असाच पुढे सुरू राहो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना. दिलीप वळसे पाटील यांना ७०व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सदिच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.