दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी 

नीला शर्मा 
शनिवार, 30 मे 2020

दीपांकिताने इस्राईलमधील शेतकरी कुटुंबांमध्ये राहून,त्यांच्या शेतात काम करून लाख मोलाचा अनुभव घेतला.तिचं पाहून धाकट्या नृपजाने जपानमधील एका शेतकरी कुटुंबात राहून, त्यांच्या शेतीचं तंत्र जाणून घेतलं.

दीपांकिता आणि नृपजा भिडे या दोघी बहिणी निसर्गात नुसती भटकंती करण्यापेक्षा त्याच्या संवर्धनासाठी विचारपूर्वक उपक्रम करत असतात. मध्यंतरी दीपांकिताने इस्राईलमधील शेतकरी कुटुंबांमध्ये राहून, त्यांच्या शेतात काम करून लाख मोलाचा अनुभव घेतला. तिचं पाहून धाकट्या नृपजाने जपानमधील एका शेतकरी कुटुंबात राहून, त्यांच्या शेतीचं तंत्र जाणून घेतलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निसर्गातील भटकंतीला जीवनशिक्षणाची जोड देणाऱ्या दीपांकिता व नृपजा या बहिणी. थोरली दीपांकिता अर्थशास्त्रातील शिक्षण घेतलं, तर धाकटी नृपजा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. दोघींना आई - बाबा (प्रिया व सुनील भिडे) यांची पर्यावरणस्नेही जीवनशैली, त्यासाठी सततचा अभ्यास व प्रयोग यांचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यामुळे यांनीही निसर्गप्रेमाला कृतीची जोड देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. नृपजा म्हणाली, ""दीपांकिता लग्न झाल्यावर सध्या अमेरिकेत आहे. तिथेही तिच्या आवडीचे प्रयोग ती करत असते. मध्यंतरी इस्राईलमधील एका शेतकरी कुटुंबात राहून त्यांच्या शेतीच्या पद्धतीची माहिती तिने करून घेतली. अडीच महिन्यांच्या वास्तव्यात क्रमाक्रमाने चार ठिकाणच्या शेतांवर ती तेथील मंडळींबरोबर राबली. एका ऍग्रो अर्बन स्कूलमध्ये लहान मुलांना शेतीकामाचा अनुभव दिला जातो. तिथे ती खूप रमली. टाकाऊ वस्तूंपासून फर्निचर, चक्क सुंदरशी खोली तयार केलेली तिने पाहिली. त्यात राहून तिने बारीकसारीक तपशील अभ्यासला. तिचं पाहून मी जपानमधील एका शेतकरी कुटुंबात महिनाभर राहिले. त्यांच्या शेतीच्या व घरातल्या कामांचा स्वतः अनुभव घेतला. यातून शब्दांत मावणार नाही, इतका मोठा खजिना मिळाला.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नृपजाने असंही सांगितलं की, पर्यावरणाशी संबंधित विविध प्रकारच्या कामांमध्ये आम्हाला रस असल्याने या क्षेत्रातल्या जगभरच्या अनेक मित्रमैत्रिणी जोडल्या गेल्या आहेत. पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेमार्फत भंडारदरा परिसरातील मुलांसाठीच्या शैक्षणिक प्रकल्पात मी सहभागी होते. आमचं संपूर्ण कुटुंबच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या विचारांनी झपाटून पूरक कृतींमध्ये रमलेलं. अलीकडेच आम्ही - "कुटुंब एक : प्रयोग अनेक' या शीर्षकाने कचरा व्यवस्थापन व निसर्ग संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यात आबालवृद्धांना सामावून घेणारे खेळ मी घेतले. पर्यावरणाचा आदर करणं, निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आमच्या पिढी समोर मोठं आव्हान आहे. बरेच तरुण मौजमजेसाठी भटकंतीला जातात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक छोट्या बदलांमधून, आपल्या परीने पर्यावरणीय काम करू शकतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipankita bhide & Nrupaja Bhide Activities for conservation