दिव्यांग प्रकाशला मिळणार का दिवाळीत हक्काचे रेशन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Shelar

सरकारने टीव्हीवर केलेल्या जाहीराती पाहून, यंदा आपलीही दिवाळी गोड होणार अशी आशा गरजूंच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

दिव्यांग प्रकाशला मिळणार का दिवाळीत हक्काचे रेशन?

कोथरुड - सरकारने टीव्हीवर केलेल्या जाहीराती पाहून, यंदा आपलीही दिवाळी गोड होणार अशी आशा गरजूंच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. मात्र वीजेचा धक्का बसल्याने हात पाय गमावून बसलेला दिव्यांग प्रकाश हक्काचे रेशन मिळवण्यासाठी गेली अडीच वर्षे झुंजतो आहे.

सुतारदरा येथील एका चाळीत राहणारा दिव्यांग प्रकाश रामदास शेलार याचे २०१९ पासून स्वतंत्र रेशनकार्ड आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये वीजेचा धक्का बसून त्याचे दोन्ही हातपाय निकामी झाले. रेशन वर धान्य मिळावे म्हणून प्रकाशने रेशन अधिका-यांकडे फेब्रुवारी २०२० ला अर्ज केला. त्यानंतर अधिकारी सांगतील त्यानुसार प्रकाश यांनी वेळोवेळी विविध कागदपत्रांसह अर्ज केले. परंतु अद्यापही त्यांना धान्य मिळाले नाही.

मयूरी शेलार म्हणाल्या की, अर्ज केल्यावर दोन महिन्यांनी या असे सांगण्यात आले. नंतर म्हणाले तुमचा अर्ज सापडत नाही. परत अर्ज करा. अर्ज करताना प्रत्येक वेळी त्यांनी सांगितली ती सर्व कागदपत्रे दिली. तरीसुध्दा आम्हाला अजून धान्य मिळालेले नाही. कोरोना काळात गरीबांना मोफत धान्य मिळणार असे सांगितले. परंतु आम्हाला ते धान्य मिळालेच नाही. अधिकारी आश्वासन देतात परंतु करत काहीच नाही.

प्रकाश शेलार म्हणाले, अधिकारी मला म्हणतात, तात्पुरती सोय करुन देतो. दुकानदार म्हणतो आम्ही आमच्या वतीने देतो. पण मला सहानुभूती वा भीक नको. माझ्या हक्काचे रेशन द्या. स्नेही मंडळी मला औषधे, किराणा आदी मदत करतात. अवयव प्रत्यारोपणासाठी सरकारने अर्थसहाय्य सुरु करण्याची गरज आहे. मागणी करुनही मला ती मिळू शकली नाही.

रेशन विभागीय अधिकारी संगिता खोमणे म्हणाल्या की, शेलार यांचे नाव व नंबर रेशनच्या ऑनलाईन यादी मध्ये दिसत असून नियमानुसार १ नोव्हेंबर पासून शेलार कुटूंबियांना रेशनचा लाभ नियमितपणे मिळू शकेल.

गतीमान व कल्याणकारी कारभाराचा डंका सरकार जाहीरातीतून मिरवते. प्रत्यक्षात मात्र सरकारी बाबू, दलाल व लाल फीतीच्या कारभारामुळे प्रकाश सारख्या दिव्यांग कुटूंबाला रेशनचा लाभ मिळवण्यासाठी झगडावे लागते. सततच्या पाठपुराव्यामुळे नोव्हेंबर पासून प्रकाशला रेशनचा लाभ मिळू शकेल असे अधिका-यांकडून सांगण्यात आले असले तरी रेशन व्यवस्थेतील अव्यवस्थेत सुधारणा कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

दिव्यांग प्रकाशला अवयव रोपण करण्यासाठी कोणतीही सरकारी मदत मिळू शकली नाही. स्नेह्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मदतीमुळे प्रकाशला कृत्रिम पाय मिळाले व हाताचे प्रत्यारोपण झाले आहे. तरीसुध्दा त्याच्यावर सुरु असलेल्या नियमित औषधोपचाराचा खर्च मोठा आहे. प्रकाशला पोहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण त्याला जलतरण तलाव व सहाय्यक कोण उपलब्ध करुन देणार हा प्रश्न आहे.