
खडकवासला (पुणे) : खडकवासला धरणातून काल बुधवार पासून मुठा नदीत सोडण्यात येत आहे. धरण साखळीत बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळी खडकवासला धरणातील येवा 5 हजार क्यूसेक पर्यंत वाढला. परिणामी सहा दरवाजा एक फुटाने उघडून गुरुवारी सकाळी आठ वाजता विसर्ग 5 हजार 136 क्यूसेक पर्यंत वाढविला आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांना सर्तकेतचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रभर संततधार
धरण साखळीतील पानशेत वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणात बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी पाच वाजता खडकवासला येथे 5 पानशेत येथे 22, वरसगाव 20, टेमघर येथे 25 मिलिमीटर पाऊस झाला होता. संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. परिणामी आज सकाळी सहा वाजता मागील 24 तासात खडकवासला येथे 12 पानशेत येथे 66, वरसगाव 62, टेमघर येथे 75 मिलिमीटर पाऊस झाला चार ही धरणात मिळून 19.41टीएमसी म्हणजे 66.58 टक्के आहे.
धरण परिसरात वाढलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील येवा एक हजार क्यूसेकहुन वाढून पाच हजार क्यूसेक पेक्षा जास्त झाला आहे. म्हणून धरणातुन विसर्ग देखील वाढविला. खडकवासला धरणातील विसर्ग काल सकाळी 428क्यूसेक केला. संध्याकाळी सहा वाजता 856 क्यूसेक सोडला होता. आज सकाळी 1712 क्यूसेक केला सात वाजता 3424, 8 वाजता 5136 क्यूसेक केला आहे.
दरम्यान बुधवारी दहा वाजता 100 टक्के भरल्यानंतर एक दरवाजा अर्ध्या फुटाने उघडून 428 क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडला. काल उपअभियंता वामन भालेराव व त्यांच्या पत्नी कल्पना भालेराव यांच्या हस्ते जलदेवतेचे साडी- चोळी अर्पण करून जलपूजन करण्यात आले. यावेळी, कर्मचारी कांचन मते, धोंडिभाऊ भागवत, वसंत ठाकर, प्रमोद रायकर उपस्थित होते.
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर चार ही धरणाचा मिळून उपयुक्त पाणीसाठा 29.15 टीएमसी आज अखेर उपयुक्त जमा पाणीसाठा 19.41 टीएमसी 66.58टक्के झाला आहे.