गुणवत्तापूर्ण शिक्षण, विकासाचे ध्येय - शिवतरे

गजेंद्र बडे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष आणि अर्थ व वित्त समितीचे सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले. त्यांच्याशी केलेली बातचीत. 

प्रश्‍न - नवीन संकल्प केले आहेत का? 
उत्तर -
 जिल्हा परिषदेतील नियमित कामांबरोबरच काही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, शहराच्या धर्तीवर गावांमधील घनकचरा, सांडपाण्याचे नियोजन, सेंद्रिय शेती मालाला जिल्ह्यातच बाजारपेठ मिळवून देणे आणि शाळांमधील गुणवत्ता वाढविणे आदींचा समावेश आहे.

नेमके काय प्रयत्न करणार आहात?
- पुणे शहर आणि जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. त्यांचा वापर उत्पन्नवाढीसाठी व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या खर्चानेच व्यापारी (व्यावसायिक) संकुलांची उभारणीचा मानस आहे. त्यामुळे व्यापारी गाळ्यांच्या भाड्यापोटी झेडपीला दरमहा कोट्यवधींचे 
उत्पन्न मिळेल. 

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू करणार आहात का?  
- शेतकरी पिके, फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात. त्यांचा सेंद्रिय उत्पादनांवर अधिक भर असतो. मात्र, मालाला उत्तम बाजारपेठ मिळत नाही. ती मिळावी आणि ग्राहकांनाही सेंद्रिय उत्पादने मिळावीत, यासाठी आठवडे बाजार आणि सरकारी जागांवर सेंद्रिय मालाचे महोत्सव आयोजिले जातील.

शिक्षण विभागात कोणते उपक्रम राबविणार? 
- शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्य देणार आहे. शिरूर तालुक्‍यातील वाबळेवाडीसारखी जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनू शकते; तर अन्य शाळा का नाही, हा माझा प्रश्‍न आहे. गुणवत्ता विकासाची प्रभावी अंमलबजावणीसह पटसंख्या वाढविण्याचे ध्येय असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion with ranjit shivtare