ढगाळ हवामानामुळे पिकांवर  रोगराई वाढण्याची शक्‍यता  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

दोन दिवसापासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने कांदा, बटाटा व तरकारी मालावर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्पादक खर्चात होत असल्याने वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. 

महाळुंगे पडवळ (पुणे)  : आंबेगाव तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने कांदा, बटाटा व तरकारी मालावर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्पादक खर्चात होत असल्याने वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. 

चास, लौकी, चांडोली बुद्रूक, साकोरे, ठाकरवाडी, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी आदी 30 गावात शाश्‍वत पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, मका, कांदा, आले, काकडी, तोंडली, मिरची, वांगी आदी पिके घेतली आहेत. ऑक्‍टोंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीमालाचे नुकसान केले. त्यातून थोडाफार शेतकरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. 

सतत बदलत असलेल्या हवामानामुळे गहू, मका, काकडी, बटाटा, कांदा व तरकारी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधांची खरेदी करून पिकांवर फवारणी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

श्रीकांत देवराम थोरात म्हणाले, ""मंगळवारपासून (ता. 3) थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पाऊस येतो की काय?अशी चिंता सतावत आहे. करपा, भुरी, डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disease may increase on crops due to cloudy weather.