
बालगंधर्व रंगमंदिरात पाण्यासाठी रोज टँकर मागविण्याची नामुष्की
पुणे - नाटक, लावणी यासह इतर सांस्कृतीक कार्यक्रम, महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती व रसिकांची गर्दी रोज बालगंधर्व रंगमंदिरात पाहायला मिळते. पण अशी स्थिती असताना बालगंधर्व रंगमंदिराला महापालिकेडूनच पुरेसा पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रोज टँकर मागविण्याची नामुष्की ओढावली असून, महापालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे सुधारित आराखडा तयार केला जात आहे. कलाकार, नाट्यरसिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, त्याचा आनंद घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाट्यगृह उभारले जाईल असा दावा महापालिका करत आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या बालगंधर्वची स्वच्छता, मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अवघ्या दोन दिवसांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बालगंधर्व च्या डागडुजीकडे लक्ष दिले आहे.
स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्यासाठी संबंधित विभागाकडून गडबड सुरू आहे, काही दिवसांपूर्वी बंद पडलेला एसी दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता गृह, चेंबर्सच्या देखभालीकडे लक्ष दिले आहे. असे असताना बालगंधर्व रंगमंदिर आतील पाण्याचा प्रश्न समोर आलेला आहे.
पाणी पुरवठा विभागाने बालगंधर्व रंगमंदिरासाठी स्वतंत्र नळजोड दिलेला आहे. याच जलवाहिनीवर मेट्रो आणि पोलिसांनी नळ जोड घेतल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून बालगंधर्वला कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे टाकी भरत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज सकाळी दोन व सायंकाळी दोन असे चार टँकर मागवून येथे पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रपती दौऱ्यामुळे टाकी घेतली भरून
राष्ट्रपती कोविंद हे २७ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात येणार आहेत. २६ मे पासून रंगमंदिराचा परिसर प्रतिबंधित केला जाणार आहे. यावेळी पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी बालगंधर्व प्रशासनाने टाकी भरून घेतली आहे.
‘बालगंधर्वला पाणी पुरवठा केली जाणारी जलवाहिनी जुनी झाल्याने तेथे कमी दबाने पाणी पुरवठा होत आहे. भवन विभागाला ही जलवाहिनी बदलण्यास सांगण्यात आले आहे.’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा
‘पाणी पुरवठा हा अत्यावश्यक बाब आहे, त्यामुळे बालगंधर्वच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या तरतुदीतून हे काम केले जाईल.’
- हर्षदा शिंदे, प्रमुख, भवन विभाग
‘बालगंधर्व रंगमंदिराला पाणी कमी येत असल्याने यापूर्वीच पाणी पुरवठा विभाग आणि भवन विभागाला कळविण्यात आले आहे. पण अद्याप काम झालेले नाही. सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.’
- संतोष वारूळे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग
Web Title: Disgrace To Order Daily Tankers For Water At Balgandharva Rangmandir Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..