शिरूर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये वाद पेटला 

नितीन बारवकर
Monday, 9 November 2020

दिवाळीची फटाकेबाजी सुरू होण्याआधीच शिरूर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शाब्दीक फटकेबाजी सुरू झाली आहे.

शिरूर : दिवाळीची फटाकेबाजी सुरू होण्याआधीच शिरूर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच शाब्दीक फटकेबाजी सुरू झाली आहे. रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या साखर वाटपावरून सुरू झालेल्या जुगलबंदीमुळे साखर वाटपाच्या गोड कार्यक्रमावर कडू छाया पसरली आहे. काल मांडवगणमध्ये आमदार अशोक पवार यांच्या निषेधार्थ गाव बंद ठेवून निषेध रॅली काढण्यात आली तर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्युत्तरादाखल शिरूरमध्ये निषेध सभा घेतली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घोडगंगाच्या पुण्यातील सभासदांना साखर वाटपाच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष आमदार ॲड. अशोक पवार व कारखान्याचे संचालक तथा शिवसेनेचे शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांच्यात बाचाबाची झाली. आमदार पवार यांनी पत्नी व मेहुण्यासह हल्ला केल्याचा फराटे यांचा आरोप असून, आमदार पवार यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. फराटे यांनीच चांगल्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सुधीर फराटे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल मांडवगणमध्ये काही काळ बंद पाळण्यात आला. निषेध रॅली काढून घेतलेल्या निषेध सभेला भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, जिल्हा सरचिटणीस शामराव चकोर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या सभेत अशोक पवार यांचा निषेध झाल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज येथील बाजार समितीच्या सभागृहात निषेध सभा घेतली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगिता शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विकास शिवले, शिरूर खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक सुरेश पाचर्णे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, पंडीत दरेकर, अनिल भुजबळ, मुजफ्फर कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार अशोक पवार यांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्व शिरूर तालुक्याला लाभले असून, त्यांच्या विकासाच्या वाटेत अडथळे आणण्याचा, स्टंटबाजी करून त्यांच्या चांगल्या कामाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास ठोशास ठोसा उत्तर दिले जाईल, असा इशारा रवीबापू काळे यांनी यावेळी दिला. आमदार अतिशय तडफेने, जिद्दीने विकासासाठी झटत असताना खोटे चित्र रंगवून चिखलफेक करणे उचित नाही. तुम्हाला त्यांना विरोधक करायचा असेल तर आगामी कारखान्याच्या निवडणूकीत लोकशाही मार्गाने लढा, विरोध करा, असे छूपे हल्ले कशाला करता, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना, 'पराभवाच्या धक्क्यातून न सावरलेल्या आढळरावांनी थोडी विश्रांती घ्यावी', असा उपरोधिक सल्ला दिला. शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला झाला असेल तर त्या निषेध सभेला शिवसैनिक नकोत का, ती निषेध सभा भाजप पुरस्कृत होती, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाला मारहाण करण्याच्या प्रकाराचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाघोली येथील सभेत निषेध केला. साखर कारखान्याच्या माध्यमातून उद्दामपणा वाढलेल्यांनी मस्तीत राहू नये. कारखाना चालवतो म्हणजे खूप मोठे झाल्यासारखे वागू नये. कारखाना कसा चालवता ते आधी पहा. सत्ता आली म्हणजे आभाळ ठेंगणे झाले असे समजून चालणार असाल तर उद्दामपणा उतरवू.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखावर हात उचलण्यापर्यंत, त्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल जाणारांचा निषेध असून, पुन्हा असा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्याकडे काही नाही, असे समजू नका. खासदार-आमदार नसतील; पण म्हणून त्यामुळे आमचे अडणार नाही. परत असे झाल्यास घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute between shivsena and ncp In Shirur taluka