तोपर्यंत बाजार समित्या बंद करणे अयोग्य; पणन मंडळाच्या संचालकांचे मत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांचे अस्तित्व ठेवावे की नाही हा मोठा प्रश्न चर्चिला जातोय. शंभर वर्षांपासून बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक थांबवीण्यासाठी या निर्माण केल्या आहेत. त्या सरसकट बंद करणे हा पर्याय नाही.

पुणे : बाजार समित्या अचूक वजन माप, वेळेत पैसे देणे, स्पर्धात्मक मालाची विक्री या तीन तत्वावर चालतात. या तिन्ही तत्वांचा पर्याय निर्माण करता आला तर खऱ्या अर्थाने बाजार समित्या बंद करण्याचा विचार करता येईल. या तत्त्वांचा विचार न करता बाजार समित्या बंद केल्या तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, असे मत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित अधिकारी-कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन मार्केट यार्डातील निसर्ग मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, उपसचिव सतीश कोंडे, नीलिमा पवार, कामिनी देशमुख, उपअभियंता प्रमोद तुपे उपस्थित होते.

पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांचे अस्तित्व ठेवावे की नाही हा मोठा प्रश्न चर्चिला जातोय. शंभर वर्षांपासून बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक थांबवीण्यासाठी या निर्माण केल्या आहेत. त्या सरसकट बंद करणे हा पर्याय नाही. बाजार समित्यांना जो पर्यंत सक्षम पर्याय उभा राहणार नाही तोवर त्या बंद करू नये. बाजार समितीच्या कायद्यामध्ये वेगाने बदल होत आहेत. 

बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख म्हणाले, बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतीमाल बाजारात आणून त्यामलाला भाव देण्यापर्यंत सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत तरच शेतकरी आणि बाजार टिकेल. अशी व्यवस्था उभा राहिली नाहीतर बाजार समित्या बंद पडतील. शेतकरी संपत चालला आहे. त्याला वाचवण्यासाठी कायमस्वरूपी धोरण निर्माण करण्याची गरज आहे. शेती उत्पन्नातील एक तृतियांश शेतीमाल सुध्दा बाजार समित्यांत येत नाही. कधीतरी अचानक जास्त माल बाजारात आला तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. बाजार आवारातील त्रुटी शोधून त्यावर उपाय शोधून पुढे जायला हवे. सर्व बाजार समित्यांचे नेटवर्क चांगले असताना तरीही आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. बाजार समित्यांमध्ये अमुलाग्र बदल करून शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवाय. शेतकऱ्यांकडे मार्केटिंग नेटवर्क नाही. शीतगृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा शेतीमाल खराब होतो.

यावेळी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, नगरसेवक प्रवीण चोरबोले, फुल बाजार असोसिएशन अध्यक्ष अरुण वीर, चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा, सहाय्यक उपसचिव दीपक शिंदे, विभाग प्रमुख बाबा बिबवे, प्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्यासह समितीचे कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dissolve Market committee is not solve problem says Sunil Pawar