esakal | राजकीय पक्ष घटस्फोटीतांचा आसरा! रोज नवा जावई, रोज नवा सासरा
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्ष घटस्फोटीतांचा आसरा! रोज नवा जावई, रोज नवा सासरा

राजकीय पक्ष घटस्फोटीतांचा आसरा! रोज नवा जावई, रोज नवा सासरा

sakal_logo
By
सागर आव्हाड - सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''आयुष्यात वेगळे काहीतरी करण्याची प्रेरणा पुस्तक वाचनातूनच मिळाली.पुस्तक वाचनातून निर्माण होणारे मन आणि संवाद स्वत:तील कार्यक्षतमा वाढविण्यास उपयुक्त ठरते. बालसाहित्याकडे दुर्लक्ष झाले हे वास्तव आहे, पण काही मंडळी सध्या या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. सकस साहित्याच्या माध्यमातून बालमनावर चांगले परिणाम घडविण्याची जबाबदारी बालसाहित्याची निर्मिती करणार्यांवरच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले. राजकारणातील दलबदलुंवर सगळे राजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटीतांचा आसरा, रोज नवा जावई इथे रोज नवा सासरा'' अशा शब्दांत फुटाणे यांनी मार्मिक टिप्पणी करताच उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.

मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार रामदास फुटाणे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर होते. मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

हेही वाचा: पुणे महापालिकेने हट्ट सोडल्याने ‘जायका’ला मंजुरी

विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.रामदास फुटाणे यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबविल्याबद्दल सुरुवातीस आयोजकांचे आभार मानले आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कौतुकही केले.

राजकारण, समाजकारणावर हलक्याफुलक्या शब्दांत फटकारे ओढत त्यांनी वास्तव चित्र उभे केले. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना, पूर्वाश्रमीचे आयुष्य सर्वांनाच मान्य होतं, दिल्लीच्या सामूहिक विवाहात घटस्फोटीतांना प्राधान्य होतं अशा मिश्किल स्वरुपात टिप्पणी केली. कुठलाही राजकीय पक्ष हा विचारांवर अवलंबून नसतो तर त्या त्या परिस्थितीवर निर्णय घेत असतो, यावर भाष्य करताना सगळेच झाले अस्थिर रोज बदलती रंग, कमळ झाले नोकिया आणि धनुष्य झाला सॅमसंग; दिल्लीचे ऐकूनच जर एकमेकांचे वैरी होतील, हात आणि घड्याळ सुद्धा लवकरच ब्लॅकबेरी होतील. राजकीय आयुष्याचे विदारक चित्र दर्शविणारी दीर्घ कविता त्यांनी ऐकविली.

loading image