

ठरावावरून राजकारण तापले
संचालकांना सहलीवर, देवदर्शनाला पाठवण्याचे प्रकार
पारनेर, ता. १५ : जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सेवा संस्थांच्या ठरावांच्या प्रक्रियेला सुरुवात होताच पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठराव आपल्या बाजूने व्हावा यासाठी काही गावांत सेवा संस्थांच्या संचालकांची पळवापळवी, तर काही ठिकाणी आर्थिक आमिषे दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
यापूर्वी जिल्हा बँकेच्या मतदानावेळी मतदारांना बाहेरगावी, देवदर्शनासाठी किंवा सहलीवर नेण्याचे प्रकार घडत असत. मात्र, यंदा ठराव होण्यापूर्वीच संचालकांना आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. काही संचालकांना नोकरी, पैसे किंवा इतर लाभांची आमिषे दाखविल्याच्याही चर्चा आहेत.
ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान यापूर्वी कधी पोलिस संरक्षणाची गरज भासली नव्हती. मात्र, यंदा अनेक विविध कार्यकारी सेवा संस्थांनी ठरावाच्या बैठकीसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे.
तालुक्यातील पाडळी रांजणगाव आणि लोणी हवेली येथील सेवा संस्थांच्या संचालकांना पळवून नेल्याच्या तक्रारींवरून पोललिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय इतर काही गावांतील संचालकांनाही ठरावापूर्वी सहलीवर पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, तालुक्यातील काही गावांत ठरावासाठी लिलावाची पद्धत अवलंबल्याचीही चर्चा असून, जास्त आर्थिक लाभ देणाऱ्या गटाच्या नावाने ठराव मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी ही रक्कम गावाच्या विकासकामांसाठी वापरली जात असल्याचे, तर काही ठिकाणी ती संबंधित संचालकांमध्ये वाटली जात असल्याचे सांगितले जाते.
अद्याप जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झालेली नसून, उमेदवारांची अधिकृत घोषणाही झालेली नाही, तरीही खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी संचालक गीतांजली शेळके, प्रशांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.