जिल्हा परिषद : सर्वसाधारण सभा दुपारी दोनऐवजी सकाळभ ११ वाजता होणार सभा

जिल्हा परिषद : सर्वसाधारण सभा दुपारी दोनऐवजी सकाळभ ११ वाजता होणार सभा
Published on

लोगो : जिल्हा परिषद

सर्वसाधारण सभा दुपारी दोनऐवजी सकाळी ११ वाजता होणार
सदस्यांची मागणी; सभेतील वाढलेल्या विषयांमुळे प्रशासन घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : जिल्हा परिषदेची १३ ऑगस्ट रोजीची सर्वसाधारण सभा अडीच वाजता सुरू होऊन रात्री ९ वाजेपर्यंत चालली. तब्बल साडेपाच तास सभा लांबल्याने इतर सदस्यांसह अधिकारीही ताटकळले. सभेपूर्वी अनेक सदस्यांनी चर्चेला पुरेसा वेळ मिळण्यासाठी सभेची वेळ दुपारी २ ऐवजी सकाळी ११ वाजताची करावी, अशी आग्रही मागणी केली. मात्र, परंपरेनुसार सभा दुपारी अडीच वाजता सुरू झाली आणि संपण्यास रात्रीचे ९ वाजले. यामुळे चर्चेला पुरेसा वेळ मिळावा आणि सर्व सदस्यांचे प्रश्न ऐकून घेता यावेत, यासाठी प्रशासनाकडून सभेची वेळ आता सकाळी ११ वाजताची करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गणपूर्ती झाल्यानंतर सर्वसाधारण सभेला सुरुवात होते. विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ५० टक्क्यांहून अधिक महिला सदस्या सभा संपण्यापूर्वीच निघून जातात. शिवाय, अनेक पुरुष सदस्यही सभेला थांबत नाहीत. सांगोला, करमाळा, माळशिरस तालुक्यांतील महिला सदस्यांना लांब जायचे असल्याने त्या निघून जातात, तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी व मोहोळ तालुक्यांतील सदस्य काही वेळ सभेला थांबतात; मात्र, सभा खूपच लांबली तर तेही निघून जातात. यामुळे काही सदस्यच सभेत उपस्थित राहून पोटतिडकीने प्रश्न मांडतात. वेळ बदलल्यास सर्वच सदस्यांना पुरेसा वेळ मिळेल व प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी बहुतांश सदस्यांची अपेक्षा आहे.

चौकट...
राज्यस्तरावरील अधिकारी ताटकळले...
सभेसाठी राज्यस्तरीय कार्यालयांचे अधिकारी हजर असतात; मात्र, त्यांचे विषय सभेच्या शेवटी येतात. या अधिकाऱ्यांनाही तीन ते चार तास थांबावे लागते. दुपारी २ वाजता आलेल्या अधिकाऱ्यांचे प्रश्न सायंकाळी ६ नंतर सुरू होतात. यामुळे अधिकारीही ताटकळून राहतात. अनेक अधिकारी दिवसभर सभेला थांबण्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीस पाठवतात. १३ ऑगस्ट रोजीच्या सभेस १७ हून अधिक अधिकारी गैरहजर होते, तर १० हून अधिक कार्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित नसल्याने त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.

कोट...
सभा दुपारी २ वाजता सुरू होते. कालची सभा सुरू होण्यास पावणे तीन वाजले. विषयपत्रिकेवरील विषय संपण्यास ५ वाजले. यानंतर सदस्यांचे प्रश्न, जिल्हा परिषद सोडून इतर विभागांच्या विषयांवर चर्चाच होऊ शकली. जर सभेतून प्रश्न सोडवायचे असतील तर नियोजन करा. त्यासाठी सभेची वेळ वाढवा. सदस्य लांबून येणार असल्याने सभा २ वाजता घेत आहात, हे कारण असले तरी त्यांना सभा संपल्यावर जायलाही वेळच होणार आहे. उलट सभा लवकर संपली तरी ते लवकर जातील.
- दादासाहेब लवटे, सदस्य, जिल्हा परिषद

नुकतीच झालेली सर्वसाधारण सभा उशिरापर्यंत चालली. अनेक सदस्यांना विषय मांडायचे होते, अधिकाऱ्यांकडून उत्तरेही घ्यायची होती. सर्वसाधारण सभेची वेळ बदलण्याची सदस्यांनी मागणी केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सभेची वेळ बदलण्याबाबत योग्य तो निर्णय घेता येईल. वेळेत सभाही सुरू होईल आणि यामुळे सर्वांचे प्रश्नही सुटतील.
- इंद्रजित पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com