

Families remember eight Alandi students who lost their lives in the Diveagar tragedy
esakal
आळंदी : दिवेआगरच्या लाटांनी आठ स्वप्नं हिरावली, पण मागे उरल्या त्या काळजाला चिरणाऱ्या आठ कहाण्या. कोणी कुटुंबाचा एकुलता एक दिवा होता. कोणाच्या भविष्यावर कुटुंब अवलंबून होते. पण, नियतीने सारं डावच उधळला होता.
तन्मयचा शेवटचा फोन
तन्मय दत्तात्रेय वहिले याने दिवेआगरला पोहोचल्यावर गुरुवारी (ता. १) सायंकाळी घरी फोन केला होता, ‘पोहोचलो’ म्हणून. तोच फोन त्याच्या कुटुंबासाठी शेवटचा ठरला. सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास आळंदीत पहिल्यांदा दुर्घटनेची खबर धडकली आणि वहिले कुटुंबावर आभाळ कोसळले. दत्तात्रेय वहिले यांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासात हुशार असल्याचे चुलते राजेश वहिले यांनी सांगितले.