चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड

चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड
Published on: 

चाकण, ता. २९ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करत चाकण औद्योगिक वसाहतीत मंदीचे सावट नसल्याने कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कामगारांना ३० हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत बोनस जाहीर केल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. यामुळे सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
देशातील एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरात वाहननिर्मिती, वाहनांचे सुटे भाग आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील हजारो कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये बजाज ऑटो, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा, फोक्सवॅगन, सॅनीइंडिया, ब्रीजस्टोन, फोर्स मोटर्स, ह्युंदाई, बॉश, जीई, गॅब्रियल यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे कच्चा माल, वाहतूक, पॅकेजिंग यांसारख्या पूरक व्यवसायांनाही मोठी बाजारपेठ मिळाली आहे.
या कंपन्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तराखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांतील हजारो कामगार काम करतात. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून दिवाळीत मिळणारा बोनस हा कामगारांसाठी एक आनंदाचा उत्सवच असतो. या बोनसच्या रकमेतून कामगार सणासुदीची खरेदी, घरखर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च तसेच इतर आर्थिक गरजा भागविण्याचे नियोजन करत आहेत. राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाचे संकट असताना औद्योगिक क्षेत्रातील बोनस दिलासादायक ठरत आहे.

महागाईच्या काळात बोनसचा आधार
वाढत्या महागाईमुळे अन्नधान्य, भाजीपाला, शिक्षण आणि घरभाड्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नियमित पगारातून घर चालवताना कामगारांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत दिवाळीत मिळणारा बोनस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मेहनतीच्या या मोबदल्यामुळे कामगारांचे मनोबल वाढण्यास निश्चितच मदत होत आहे.

औद्योगिक वसाहतीतील स्थिती :
एकूण कंपन्या : पाच हजारांपेक्षा अधिक
एकूण कामगार : सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त
कायम कामगार : २० टक्के
कंत्राटी कामगार : ८० टक्के
मोठ्या कंपन्यांतील बोनस : वेतन करारानुसार ३० ते ५५ हजार किंवा २० टक्क्यांपेक्षा जास्त
छोट्या कंपन्यांतील बोनस : एका पगाराएवढा (८.३३ टक्के)
इतर लाभ : दिवाळी भेटवस्तू आणि खरेदीसाठी मॉलमधील कूपन्स

यावर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती असली तरी औद्योगिक वसाहतीत मंदीचे सावट नाही. त्यामुळे कंपन्यांनी कामगारांना चांगला बोनस दिला आहे. काही कामगारांना ३० ते ५५ हजार रुपयांपर्यंत, तर काहींना एका पगाराएवढा बोनस मिळाला आहे.
- जीवन येळवंडे, अध्यक्ष, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com