

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ ः दिवाळी म्हटले की नातेवाइकांना, मित्रमंडळींना आणि आप्तेष्टांना भेटवस्तू व मिठाई देण्याची घाई असते. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात तसेच घरपोच भेटवस्तू आणि मिठाई पोहोचविली जाते. यासाठी आता प्रत्यक्ष जाण्याऐवजी खासगी ऑनलाइन डिलिव्हरी सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. शिवाय, डिलिव्हरी बॉय दिवसाला तीन ते चार हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे यंदा ग्राहकांसोबतच डिलिव्हरी बॉयचीही दिवाळी गोड झाली आहे.
दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असतानाच भेटवस्तू आणि मिठाई पाठविण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेक नागरिक कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतः भेटवस्तू पोहोचविण्याऐवजी ऑनलाइन डिलिव्हरी सेवेचा पर्याय निवडत आहेत. खासगी ॲपच्या माध्यमातून दुचाकीवरून कमी वेळेत शहरातील विविध भागांत पार्सल पोहोचविणे शक्य होत असल्याने या सेवेचा वापर वाढला आहे. विशेषतः मिठाईची दुकाने, गिफ्ट शॉप, ड्रायफ्रूट विक्रेते आणि इतर व्यावसायिकांकडूनही ग्राहकांच्या पत्त्यावर वस्तू पाठविण्यासाठी डिलिव्हरी सेवेचा आधार घेतला जात आहे. तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त घरापासून दूर असलेले नागरिक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना दिवाळीचे गिफ्ट पाठविण्यासाठी या सेवेचा वापर करत आहेत. दिवाळीच्या काळात डिलिव्हरीच्या ऑर्डरमध्ये वाढ झाल्याने डिलिव्हरी बॉयना अधिक काम मिळत आहे. नियमित कामासोबतच सणासुदीच्या काळात अतिरिक्त फेऱ्या मारून उत्पन्न वाढविण्याची संधी त्यांना मिळत आहे. मागणीनुसार दिवसभर डिलिव्हरी केल्यास काही जणांना दिवसाला तीन ते चार हजार रुपयांपर्यंत कमाई होत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार युवक आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही सेवा रोजगाराचे साधन ठरत आहे. एकीकडे दिवाळीच्या खरेदीचा उत्साह, तर दुसरीकडे भेटवस्तू वेळेत पोहोचविण्याची नागरिकांची धावपळ अशा परिस्थितीत डिलिव्हरी बॉय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्राहकांच्या आनंदात भर घालणाऱ्या या डिलिव्हरी सेवेमुळे अनेक तरुणांच्या घरातही दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
माझा हॉटेल व्यावसाय होता. पण, तो काही कारणास्तव बंद करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून घरी बसून होतो. मग मला ऑनलाइन डिलिव्हरी सेवेची माहिती नातेवाइकांकडून मिळाली. दिवाळीत ही सेवा सुरू केली. आता भेटवस्तू व मिठाई पाठवण्यासाठी ऑनलाइन डिलिव्हरी सेवेला मागणी वाढली आहे. एक ऑर्डर सोडली की लगेच दुसरी ऑर्डर मिळते. दिवसाला तीन हजारांहून अधिक रुपये मिळतात.
- राजेश शिर्के, डिलिव्हरी बॉय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.