Diwali Festival 2020 : वसुबारस : पहिला दिवा आज लागणार दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diwali first day

कोरोनाचा काळ प्रत्येकाच्या मनांवर झाकोळून राहिला होता. या अंधारावर दिवाळीच्या चैतन्याने मात केली. दरवर्षीच्या उत्साहात हा दिव्यांचा सण साजरा करण्यास पुणेकर सज्ज झाले आहेत.

Diwali Festival 2020 : वसुबारस : पहिला दिवा आज लागणार दारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - निराशा अन्‌ भीतीचा काळोख सर्वत्र दाटला होता खरा... आता या तमाच्या तळाशी दिवे पेटले जरा... चैतन्याने मनोमनीचा आनंद हा फुलला न्यारा... दीपज्योतीच्या ओजाने तेजाळला संसार सारा... तमाच्या तळाशी दिवे पेटले जरा... प्रत्येकाच्या मनामनांत, रोमारोमांत चैतन्य फुलविणारा दीपोत्सव अर्थात दिवाळीचा सण आज आश्‍विन वद्य एकादशीच्या मुहूर्तावर सुरू झाला आणि दिवाळीचा पहिला दिवा दारी पेटला...

गेली आठ महिने कोरोनाचा काळ प्रत्येकाच्या मनांवर झाकोळून राहिला होता. या अंधारावर दिवाळीच्या चैतन्याने मात केली. दरवर्षीच्या उत्साहात हा दिव्यांचा सण साजरा करण्यास पुणेकर सज्ज झाले आहेत. नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. त्यापूर्वी रमा एकादशीला दारी दिवा लावण्याची प्रथा आहे, नंतर वसुबारसेला गोवत्स पूजा केली जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले, ‘‘कार्तिक शुक्‍ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. चैत्र शुक्‍ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्‍ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. मुख्यतः घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ केल्यामुळे संपूर्ण समाजात-कुटुंबात एकोपा राखला जातो. सण-उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी-विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते.’’

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्ष्मीपूजन मुहूर्त (१४ नोव्हेंबर, शनिवार)
मोहन दाते म्हणाले, ‘‘लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी शनिवारी (ता.१४) एकाच दिवशी आले आहे. 
नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान : पहाटे साडेपाचपासून 
लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त :  दुपारी १:५० ते दुपारी ४:३०   सायंकाळी ६:०० ते रात्री ८:२५ रात्री ९:०० ते रात्री ११:२०. 
बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि वहीपूजन सोमवारी 
वहीपूजनाचे मुहूर्त : पहाटे २:०० ते ३:३५
पहाटे ५:१५ ते ८:००  सकाळी ९:३० ते ११:००

भाऊबीज (यमद्वितीया)
(१६ नोव्हेंबर, सोमवार)

कार्तिक शुक्‍ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.

loading image
go to top