

पुणे, ता. ८ : दिवाळीच्या सणादरम्यान पुण्यातील हवेच्या गुणवत्तेवर फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर शहरातील हवाप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. सायंकाळी पाच वाजता शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १६३ इतका होता. मात्र, फटाक्यांची आतषबाजी वाढल्यानंतर अवघ्या तीन तासांत त्यात वाढ होऊन रात्री आठ वाजता एक्यूआय .... वर पोहोचला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ‘समीर’ या मोबाईल ॲपवर उपलब्ध आकडेवारीनुसार, पाच ते सात नोव्हेंबर या तीन दिवसांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीत होता. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता १६३ असलेला एक्यूआय रात्री आठ वाजता .... पर्यंत पोहोचला. व्यापारी पेठा, बाजारपेठा आणि वर्दळीच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र बेरियम आणि तत्सम रसायनांचा वापर असलेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजविण्याच्या प्रमाणात काहीशी घट जाणवली.
हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी पीएम २.५ आणि पीएम १० या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. फटाक्यांच्या स्फोटांमधून निर्माण होणारा धूर, राख आणि सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळतात. त्यामुळे या कणांचे प्रमाण वाढून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. विशेषतः पीएम २.५ हे अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यंदा दिवाळीच्या काळात पावसाने हजेरी न लावल्याने हवेत साचलेले प्रदूषक कण वाहून जाण्याची प्रक्रिया मर्यादित राहिली. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने प्रदूषणात भर पडली.
हवेची गुणवत्ता (एक्युआय)
निर्देशांक - स्थिती
० ते १०० : उत्तम हवा
१०० ते २०० : समाधानकारक
२०० ते ३०० : वाईट
३०० ते ४०० : अत्यंत वाईट
४०० ते ५०० : अतिधोकादायक (गंभीर)
दिवाळीतील हवेची गुणवत्ता (एक्युआय)
५ नोव्हेंबर : १३०
६ नोव्हेंबर : १३४
७ नोव्हेंबर : १५७
८ नोव्हेंबर : (सायंकाळी ५ वा.) - १६३, (रात्री ८ वा.) - ....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.