

मार्केट यार्ड, ता. ८ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी लक्ष्मीपूजनासाठी फुलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा फुलांच्या उत्पादनात घट झाली असून, त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात दाखल होणाऱ्या फुलांमध्ये खराब आणि कमी दर्जाच्या फुलांचे प्रमाण अधिक असून, चांगल्या प्रतीच्या फुलांची उपलब्धता मर्यादित आहे.
सणासुदीत धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी, घरगुती सजावट आणि शुभकार्यांसाठी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पारंपरिक फुलांसह आकर्षक सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या मागणीतही वाढ झाली आहे. विशेषतः झेंडू, शेवंती, गुलाब आणि गुलछडी या फुलांना मागणी आहे. त्याचबरोबर डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशन, ऑर्चिड आणि लिलियम यांसारख्या सजावटीच्या फुलांच्या भावातही वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील फूलबाजारात सध्या फुलांची आवक नेहमीप्रमाणे होत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे फुलांना उठाव आहे. मागणीच्या तुलनेत आवकेत विशेष वाढ नसल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. फुलांच्या प्रकारानुसार भाववाढीचे प्रमाण वेगवेगळे असून, बहुतांश फुले १० ते २० टक्क्यांनी महागली आहेत.
बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढलेली आहे. मात्र, सणासुदीमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, भाऊबिजेपर्यंत ही मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.’’
- अरुण वीर,
अध्यक्ष, अखिल फूलबाजार आडते असोसिएशन
एकीकडे सणासुदीमुळे फुलांना वाढलेली मागणी आणि दुसरीकडे दर्जेदार फुलांचा अपुरा पुरवठा, यामुळे फुलांच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. झेंडू, शेवंती, गुलाब, गुलछडीसह सजावटीच्या फुलांनाही मोठी मागणी असून, भाऊबिजेपर्यंत ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
- सागर भोसले,
समन्वयक, अखिल फूलबाजार आडते असोसिएशन
फुलांचे घाऊक भाव (रुपयांत)
पारंपरिक फुले : झेंडू : ५० ते १००, गुलछडी : १२० ते १८०, अॅष्टर (गड्डी) : ३० ते ५०, अॅष्टर (सुट्टा) : १५० ते ३००, शेवंती : ५० ते २००, गुलाब (गड्डी) : ३० ते ५०, गुलछडी (काडी) : ५० ते २००, शेवंती (काडी) : २०० ते ४००, जुई : ८०० ते १२००, चमेली : ८०० ते १२००, डच गुलाब (२० नग) : १२० ते २००, जर्बेरा : ५० ते १००, कार्नेशन : १५० ते २५०, लिलियम (१० काड्या) : १२०० ते १८००, ऑर्चिड : ४०० ते ६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १०० ते २००, जिप्सोफिला : १५० ते २५०, लिली (बंडल) : २० ते ४०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.