

पुणे, ता. ५ ः गोमातेचे पूजन, सवत्स गाईची आराधना आणि तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत गुरुवारी वसुबारस साजरी झाली. गोमाता पूजनाने दीपावलीच्या आनंदपर्वाला आजपासून प्रारंभ झाला असून, पुढील सहा दिवस लखलखत्या दिव्यांचा, तेजाचा आणि अपार आनंदाच्या या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे.
दसरा संपल्यानंतर दिवाळीची चाहूल लागली आणि सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागले. दीपमाळ, आकाशदिवे आणि फराळाच्या पदार्थांची लगबग सगळीकडे सुरू झाली. यंदाच्या सणावर दुष्काळाचे सावट असले, तरी सणाच्या निमित्ताने आनंदाचे चार क्षण वेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीच्या या मंगल पर्वाची सुरुवात गुरुवारी गोमाता पूजनाने झाली. वसुबारसेनिमित्त सायंकाळी वासरासह गाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (ता. ६) धनत्रयोदशी आणि यमदीपदान आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, म्हणजेच रविवारी (ता. ८) आले आहे. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याचे महत्त्व असते. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. यंदा लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० असा आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
व्यापारी नववर्षाची सुरुवात
मंगळवारी (ता. १०) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा होईल. या दिवशी दानशूर बळीराजाचे पूजन केले जाते. या दिवशी व्यापारी नववर्षाची सुरुवात होत असल्याने वहीपूजन आणि दुकानपूजन करण्याची परंपरा आहे. वहीपूजनासाठी पहाटे २.१० ते ५.१०, सकाळी ६.३५ ते ७.२५ आणि सकाळी ११.०० ते दुपारी २.०० असे मुहूर्त आहेत. बुधवारी (ता. ११) भाऊबीज साजरी होणार आहे, असे दाते यांनी सांगितले.
यंदाच्या दिवाळीतील महत्त्वाचे दिवस
- धनत्रयोदशी, यमदीपदान - शुक्रवार, ६ नोव्हेंबर
- नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन - रविवार, ८ नोव्हेंबर
- बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा - मंगळवार, १० नोव्हेंबर
- भाऊबीज - बुधवार, ११ नोव्हेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.