

ऊंसमळा
‘ऊंसमळा’च्या या वर्षीच्या अंकात समृद्ध शेतीसाठी एआय तंत्रज्ञान, अवर्षण आणि अवकाळी परिस्थितीतील ऊस पिकाचे नियोजन, महाफीडची दर्जेदार उत्पादने, परदेशातील शेती, नैसर्गिक शेती, रानभाज्या. मधमाशीपालन, सोलर सिस्टिम, कृषियोजना, ॲग्रो टुरिझम या आणि अशा विषयांवर तज्ज्ञांचे लेख देण्यात आले आहेत. तसेच कथा, कविता, ललित, प्रवासवर्णन, सिनेविभाग, साखर उतारा अशा साहित्यिक फराळाची, मेजवानीही जोडीला आहेच. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध महिलांचे मनोगत ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या लेखात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच कवितांचाही यात स्वतंत्र विभाग आहे. प्रवासवर्णनात भारती सावंत यांचा ‘माझी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश टूर’ यांचा लेख समाविष्ट आहे. संपादक भाग्यश्री देशपांडे यांनी या लेखातून ‘थेट भेट ग्रेट भेट’ हा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीचा अनुभव मांडला आहे.
- संपादक : भाग्यश्री देशपांडे, कार्यकारी संपादक : गणेश देशपांडे, पाने : ८०, किंमत : ९० रुपये
PNE26W65194
------------
विवेक संवाद
दिवाळी अंकांच्या भव्य परंपरेत ‘विवेक संवाद’ने यंदा आपला पहिलाच दिवाळी अंक वाचकांसाठी सादर केला आहे. अंकासाठी अनेक मान्यवरांनी लेखन केले आहे. प्रामुख्याने डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. प्रवीण दवणे, प्रा. मिलिंद जोशी, सुधीर गाडगीळ, प्रा. विश्वास वसेकर, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. न. म. जोशी, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. पंडित विद्यासागर, केशव साठये, राज काझी, मुकुंद संगोराम आदी मान्यवरांनी लिहिलेले लेख या अंकात आहेत. यात प्रामुख्याने ज्यांची शताब्दी आहे किंवा ज्यांना शतकोत्तर आयुष्य लाभले आहे, अशा मान्यवरांचे लेखन यात आहे. त्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले, कविवर्य नारायण सुर्वे, मराठी भाषा विदुषी प्रा. यास्मिन शेख, प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्यावरील लेख या अंकात आहेत. काही लेख विचारांना दिशा देणारे, काही सद्य:स्थितीवर भाष्य करणारे, काहल ललित गद्याचा आनंद देणारे, तर काही निखळ विनोदी अंगाने खुसखुशीत असणारे असे सर्व प्रकारचे साहित्य वाचनानंद वाढवणारे आहेत.
मुख्य संपादक : विवेक इनामदार, संपादक : श्रीकांत चौगुले, पाने : १७२, किंमत : २५० रुपये
PNE26W65196
-----------
भूमिका
‘भूमिका’ या दिवाळी अंकात यंदा विविध प्रांतातील बोलीभाषांबाबत ‘बोली’ हा स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. यात डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. सुमन जाधव यांनी भाष्य केले आहे. यात सातारी, मराठवाडी, मराठवाडी, झाडीबोली, वऱ्हाडी, नगरी, वैभव साटम, मालवणी, कुणबी, कलाली, दखनी, बंजारा, वडारी, प्रमाणभाषा अशा विषयांवर तज्ज्ञांनी लेखांचे सौंदर्य फुलवले आहे. तर, अंकातील ‘व्यक्तिदीप’ विभागात प्राचार्य शिवाजीराव मोहिते यांची श्रीकांत चौगुले यांनी घेतलेली मुलाखत वाचनीय आहे. डॉ. लता पाडेकर यांनी लिहिलेला सुरेश पाटोळे यांच्यावरील, काशिनाथ आल्हाट-पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सकाटे यांच्यावरील तसेच अनिल गुंजाळ यांचा लेख या व्यक्तिचित्रांतून त्या-त्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अधोरेखित झाले आहेत. यांसह ‘स्मरणदीप’ सदरात महात्मा फुले, डी. रामानायडू, नारायण सुर्वे, मधु कांबीकर, वेणूताई चव्हाण, आशा भोसले, नाना पाटेकर या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्यात आला आहे. तसेच कथा, कविता, प्रवासवर्णनाने हा अंक भरगच्च झाला आहे.
संपादक : प्रा. रुपाली अवचरे, पाने : २२०, किंमत : २५० रुपये
PNE26W65197
------------
शुभम
प्रिय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘शुभम’ दिवाळी अंकाने यंदाही विविधांगी लेख वाचकांपुढे सादर केला आहे. यामध्ये लेख, कथा, प्रवासवर्णन, व्यंगचित्रे, हास्यक्लब, वात्रटिका, पाककृती यांसह बालकुमार विभागात गोष्टी, कविता, बालकविता, हायकू हा काव्यप्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. लेखांमध्ये साईबाबा आणि श्रीराम, महाराष्ट्राच्या उद्योगस्वामिनी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील सार्वजनिक नेतृत्व, इस्त्री केलेले म्हातारपण आदी विषयावरील लेख समाविष्ट आहेत. तर, ‘टेबल टॉक, जोडीदार, वस्त्रहरण, माळ्याच्या मळ्यात कोन बाय उभी, कोपऱ्यातून क्षितिजाकडे या कथांचा समावेश आहे. बालकुमार विभागात संदीप गवई-दोन मैत्रिणी, महेंंद्र मनोहर- मधुर आणि मिरची, प्रा. कैलास दौंड-मातीचा माणूस, सचिन बेंडभर- राष्ट्रभक्ती, महेंद्र फाटे - हसा मुलांनो हसा हा साहित्याचा समावेश आहे.
- संपादक : मनीषा फाटे, पाने : १६०, किंमत : ३०० रुपये
PNE26W65195
-------
PNE26W65194, PNE26W65195, PNE26W65196, PNE26W65197
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.