दिल्लीत रंगली ‘आयुष्यावर बोलू काही’ची मैफिल ‘सकाळ’ आयोजित दिवाळी संध्या कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद

दिल्लीत रंगली ‘आयुष्यावर बोलू काही’ची मैफिल
‘सकाळ’ आयोजित दिवाळी संध्या कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली, ता. ६ : दिवाळीचे औचित्य साधत देशाची राजधानी दिल्लीमध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या मराठी कविता आणि संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
‘सकाळ’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला देशाच्या राजधानीतील हा तिसरा ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रम होता. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे या नामवंत कलाकारांच्या जोडगोळीने बालगीते गाऊन धमाल उडवलीच, पण आयुष्याच्या विविध छटांवर भाष्य करणाऱ्या कविता व गाणी सादर करत रसिकांची मने जिंकली.
थंडीची चाहूल लागलेल्या दिल्लीत रसिक चाहत्यांची कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील मावळणकर सभागृहात गर्दी ओसंडून वाहत होती. ‘आयुष्यावर बोलू काही’ या गीताने सलील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कविता आणि गाण्यावर ठेका धरणारा रसिक प्रेक्षक दिल्लीत लाभणे भाग्याचे असल्याचे ते म्हणाले.
ढिपाडी ढिपांग, ढिचीपाडी ढिपांग. काळी माती निळं पाणी... या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेका धरला. गाणी आणि कविता अशा मिश्रणातून कुलकर्णी-खरे यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मनं तळ्यात, मळ्यात-जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोतीमाळ... हे गाणे गायकांनी सुरू केले खरे, पण तालासुरात प्रेक्षकांनी सहभाग घेत स्वत:च हे गीत गाण्यास सुरुवात केली. सुमारे तीन तास चाललेल्या कार्यक्रमात अनेक गाण्यांवरील ‘वन्स मोअर’ ची मागणी गायकांना नाकारता आली नाही. अग्गोबाई, ढग्गोबाई... गीताने सांगता झाली.
अमरावती येथील एका कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर हे बाजूला असताना प्रेक्षकांनी ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ गीत गाण्याचा आग्रह धरला. हे गाणं गात असताना संपूर्ण सभागृह त्या गाण्यात सामील झाले. यावर मंगेशकर यांनी मलाही या गाण्याच्या काही ओळी द्या, मी देखील गातो, असे सांगितले, हा किस्सा कुलकर्णी यांनी सांगितला. मराठीतले सर्वांत प्रसिद्ध असे ‘छडी लागे छम छम...’ हे गीत मंगेशकर यांनीच गायले होते, होते असे सांगत कुलकर्णी यांनी प्रत्येक मोठ्या गायकासाठी बालगीत हे सर्वांत कठीण असते, अशी टिप्पणी केली.

नरवणे, लळीत आदींची उपस्थिती
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे या कार्यक्रमासाठी सपत्नीक आले होते. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास देशाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, खासदार अरविंद सावंत, इंडियन सिव्हिल अकाउंट्स सेवेच्या अधिकारी रेखा रायकर, व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘डीपीआयआयटी’च्या अधिकारी सुप्रिया देवस्थळी, पोस्ट खात्याच्या ऑडिट विभागाचे संचालक सौरभ देशमुख, सनदी अधिकारी रोहिणी भाजीभाकरे, भाजपचे नेते श्याम जाजू, राष्ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, भाजप नेते सुनील देवधर, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, महेंद्र लड्डा, अनिल पाटील, दिल्लीचे उप कामगार आयुक्त तुकाराम लांडगे, नितीन सरदारे, सोनाली पाठक, प्रवीर चित्रे हे उपस्थित होते.
याशिवाय ‘डीपीआयआयटी’चे संचालक सागर कडू, डीजीसीएचे सहा. संचालक प्रसाद आवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कांबळे, डॉ. हेमा कोल्हे, डॉ. भारत भुयार, ले. कर्नल कौस्तुभ जाधव, प्रसिद्ध सतारवादक परिमल सदाफळ, अ. भा. सिद्धार्थ वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा सुजाता अंभोरे, सेंट्रल बॉयलरचे सचिव संदीप कुंभार, आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूटचे संचालक आदेश मुळे, सौरभ गडकरी, अमित भोळे, सेंबफॉर्मचे उपाध्यक्ष महेंद्र वीरापास, ‘आयएफएफडीसी’चे व्यवस्थापकीय संचालिका माधवी वीरापास, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलापते यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
-------------------------

मराठी समाज हा कलाप्रेमी आहे. संगीत, नाट्य हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. दिल्लीतही मराठी कुटुंब मोठ्या संख्येने राहतात आणि ते दिल्लीच्या मातीतील होऊनच कार्यरत राहतात. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी असल्याने आम्हाला विशेष प्रेम आहे. दिल्ली सरकार कायम येथील मराठी कुटुंबांच्या सुख-दुःखात आणि सण - उत्सवात सोबत असेल.
- विजेंद्र गुप्ता, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष
----------------------

नवी दिल्ली ः ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमात तल्लीन झालेले माजी सरन्यायाधीश उदय लळीत, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित दिल्लीतील दर्दी रसिकप्रेक्षक..

नवी दिल्ली ः संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांचे स्वागत करताना खासदार अरविंद सावंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.