

पिंपरी, ता. २५ : दिवाळीला गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वच नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून अनेक रेल्वे गाड्यांचे तिकिटे ‘वेटिंग’वर आहेत. रेल्वे प्रशासनाने काही मार्गावर ‘विशेष रेल्वे’ चालविण्याचा निर्णय घेतला असला तरी बहुतांश विशेष रेल्वे गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याची स्थिती आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, व्यवसाय आणि कामानिमित्त विद्यार्थी, चाकरमानी मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळीत शाळा, कॉलेजला सुट्टी असल्यामुळे हे नागरिक हमखास गावी जातात. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्यामुळे प्रवाशांची रेल्वेला पसंती असते. मात्र, सुट्यांचे दिवस आले की, रेल्वेचे आरक्षण लगेच फुल्ल होते. त्यामुळे काहीजण पूर्वनियोजित आरक्षणावर भर देतात. यंदा दिवाळी पाच नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने तिकीट आरक्षणासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. मात्र, ते मिळत नसल्याने नागरिकांनी पर्यायी वाहनांची चाचपणी सुरू केली आहे.
विशेष रेल्वेला शहरात थांबा नाही
प्रशासनाने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, खडकी आणि हडपसर रेल्वे स्थानकांवरून या विशेष रेल्वे सुटणार आहेत. या गाड्यांना पिंपरी किंवा चिंचवड स्थानकांवर थांबा नसल्याने शहरातील नागरिकांना पुणे, खडकी किंवा हडपसर स्थानकापर्यंत जावे लागणार आहे.
तत्काळ तिकिटाची सुविधा
तत्काळ तिकीट रेल्वे जेथून सुटणार आहे, त्या वेळेच्या २४ तास अगोदर सकाळी १० ते ११ या वेळेत थ्री टियर एसी, टू टियर एसी, प्रथम श्रेणी एसी, चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे, तर ११ ते १२ या वेळेत स्लीपर क्लासचे आरक्षण तिकीट खिडकीवरही काढण्याची सुविधा आहे.
रेल्वेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. पण, वेटिंग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे एसटी किंवा खासगी वाहनाने गावी जाण्याचा विचार करत आहे.
- नीलेश देशमुख, प्रवासी, निगडी
पुणे, खडकी आणि हडपसर या रेल्वे स्थानकांवरून दिवाळी आणि छठ पूजा निमित्त विशेष रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग
विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
- हडपसर ते मुजफ्फरपूर - सोमवारी आणि मंगळवारी - सायंकाळी ७.५५
- हडपसर ते गाझीपूर - मंगळवार आणि शुक्रवारी - सकाळी ६.५५
- हडपसर ते नागपूर - मंगळवार, शुक्रवारी आणि रविवारी - सायंकाळी ४.०५
- हडपसर ते गोरखपूर - दररोज - सकाळी ७.०५
- पुणे ते अमरावती - प्रत्येक मंगळवारी - सायंकाळी ७.५५
- खडकी (पुणे) ते हजरत निजामुद्दीन, दिल्ली - मंगळवारी व शुक्रवारी - सायंकाळी ५.३०
- खडकी (पुणे) ते सांगानेर (जयपूर) - प्रत्येक गुरुवारी - सकाळी ९.४५
- पुणे ते दाणापूर - दररोज - दुपारी ३.४०
- हडपसर ते प्रयागराज - प्रत्येक गुरुवारी - रात्री १०.४०
- पुणे ते मुजफ्फरपूर - सोमवारी व मंगळवारी - सायंकाळी ७.५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.