चला, ‘डीजे’बंदीचा ‘श्रीगणेशा’ करूया

चला, ‘डीजे’बंदीचा ‘श्रीगणेशा’ करूया
Published on

पिंपरी, ता. ७ : ‘‘सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि लेझर लाइटचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक गोंगाट सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीनुसार हे उत्सव साजरे व्हावेत,’’ अशा प्रतिक्रिया वाचकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या आहेत. डीजेचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर वाचकांनी आपले विचार व्यक्त करत ‘डीजेबंदीचा श्रीगणेशा यंदाच्या गणेशोत्सवापासून करूया’’ असे आवाहन केले आहे.

डीजे आणि लेझर लाइटमुळे स्थानिक पशू-पक्ष्यांना त्रास होतो. हे कैकवेळा लक्षात आले आहे. हे पक्षी कोठेही भरकटत जातात. त्यामुळे डीजे आणि लेझर लाइटचा वापर टाळला पाहिजे.
- संभाजी वाठारकर, चिंचवड

आधी गणेशोत्सवात स्पीकर लावले जायचे. पण, आता फक्त डीजे वाजवण्यासाठी गणपती बसवला जातो का, असा प्रश्‍न निर्माण होतो. गणेशाच्या नावाखाली सरकारसंमत उच्छाद मांडला जातो. गणेश ही बुद्धीची आणि कलेची देवता आहे, याचा विसर कधीच पडला आहे. आता ओंगळवाणे प्रदर्शन करण्यासाठी गणेशोत्सव फक्त निमित्तमात्र उरला आहे. डीजेबंदीचा श्रीगणेशा गणेशोत्सवापासून करूया आणि तो नियम सर्व जाती, धर्म आणि राजकीय पक्षांच्या मिरवणुकांना लावूया.
- ओंकार पाटील, चिंचवड

गणपती मिरवणूक, नवरात्र उत्सव या काळात सार्वजनिक मंडळाच्या डीजे मिरवणुकीत दोन शेजारी असणाऱ्या मंडळामध्ये एक डीजे असावा. यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यासाठी मदत होऊ शकते.
- नीलेश बोराटे, पिंपरी

ध्वनिप्रदूषणामुळे कामगार, विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो. उत्सव मिरवणुकीत धांगडधिंगा घालणाऱ्या कार्यकर्त्यांना नाही, कारण हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काय देणे-घेणे नाही. त्यांचे काम सुरू होते, निवडणुका आल्यावर. कुठल्याही राजकीय पक्षाने याबाबतीत ठाम भूमिका घेतली नाही; मात्र निवडणुका आल्यावर आम्हाला मत मागायला येतात.
- कल्याण चिलवंत, रावेत

डीजे वापरावर काही प्रमाणात निर्बंध असावेत. उत्सव साजरा केलाच पाहिजे. दिवसभर कानात हेडफोन, ब्लूटूथ वापरणारे अनेक जण आहेत. त्यामुळेही कानाला त्रास होतो. १५० कोटी लोकांचा देश आहे. आपणच आपल्या लोकांची मदत केली पाहिजे.
- डॉ. सचिन नागापूरकर, अस्थिरोग तज्ज्ञ, पुणे

संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि लेझर लाइट्सचा वापर त्वरित आणि १०० टक्के बंद केला पाहिजे. त्याऐवजी सामाजिक प्रगतीसाठी कार्यक्रम सुरू केले जावेत; हे कार्यक्रम अशा प्रकारे आखले जावेत की ते लोकांना आवडतील आणि कंटाळवाणे वाटणार नाहीत. या कार्यक्रमांमध्ये आर्थिक गुंतवणूक केली जाऊ शकते.
- बी. एस. पवार, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com