Pune : कसंही करा, पण दंड भरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

कसंही करा, पण दंड भरा

sakal_logo
By
सु. ल. खुटवड -सकाळ वृत्तसेवा

सायंकाळपर्यंत एकही दंडाची पावती फाडू न शकल्यामुळे वाहतूक विभागाचे हवालदार शिंदेमामा त्रस्त झाले होते. आजही साहेबांची बोलणी खावी लागणार, याची भीती त्यांना वाटू लागली.

‘‘वाहतुकीचे नियंत्रण करणे, हे तुमचे काम नाही. अधून- मधून वाहतुकीची कोंडी होतच राहते. त्याकडं एवढं लक्ष द्यायची गरज नाही. लोकांनाही त्याची सवय झालेली असते. आपलं काम लोकांकडून दंड वसूल करण्याचं आहे. त्यासाठी तुम्ही पाच-सहा जणांनी एकत्रित कोंडाळं करून, वाहनचालकांना अडवलं तरी चालेल पण रोजचं टार्गेट पूर्ण करा.’’ असं म्हणत कालच साहेबांनी त्यांना झापलं होतं. त्यामुळं आज पुन्हा वाहतुकीचे नियंत्रण करत होतो, हे कारण सांगता येणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे ते पुन्हा सावज टिपण्यासाठी एका झाडाआड लपले.

आज सकाळी हेल्मेट व मास्क न घातलेल्या तरुणाला त्यांनी पकडलं होतं. सिग्नलही त्याने तोडला होता. त्यामुळे किमान दोन हजारांचा दंड तरी वसूल करायचाच, असा निर्धार त्यांनी केला होता. कितीही विनवण्या केल्या तरी आपण दाद द्यायची नाही, असेच हवालदारसाहेबांनी ठरवले.

गाडीला बाजूला घेत व गुटख्याची पिचकारी मारून तोंड मोकळे करून तो तरुण गुर्मीत म्हणाला, ‘‘मला उशीर होतोय. जाऊ द्या.’’ त्यावर हवालदारसाहेबांनी ‘त्याचं काय चुकलंय व किती दंड भरावा लागेल’, याची माहिती नम्रतेने दिली.

‘‘मला ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा पुतण्या आहे.’’ असं म्हणून त्याने नगरसेवकाला थेट फोन लावून दिला.

आमदार, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी यांचे कोणीही जवळचे वा लांबचे नातेवाईक असल्यास त्यांच्यावर कारवाई करायची नसते उलट त्यांना चहापान करायचे असते, असा रिवाज आपल्या खात्यात असल्याचा अनुभव हवालदारसाहेबांना होता.

‘‘तो तरुण माझा पुतण्या आहे. त्याला सोडून द्या.’’ असा आदेश नगरसेवकाने फोनवरून दिल्यावर ‘होय साहेब’ असे म्हणत हवालदारसाहेबांनी तरुणाला सोडून दिले. थोड्यावेळाने एका आजोबाने सिग्नल तोडल्याने त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

‘‘ही काय मोगलाई लागून गेली काय? तुम्ही सिग्नल एवढ्या उंचीवर कशाला लावलेत? आम्ही काय मान वरून सिग्नल बघायचे का? ते गाड्यांसाठी आहेत की विमानांसाठी आहेत, याचा खुलासा करा. मग दंड घ्या.’’ असे म्हणून आजोबांनी हवालदारसाहेबांना भंडावून सोडले. ‘दंड भरू नका पण जास्त बोलू नका’ असे हवालदारसाहेबांनी त्यांना वैतागून म्हटलं.

‘‘म्हणजे आम्ही मुस्कटदाबी सहन करायची का? मी आजच पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून, तुमच्या या कृतीचा निषेध करणार आहे.’’ असे म्हणून आजोबा सुसाट वेगाने निघून गेले. त्यानंतर हवालदारसाहेबांनी पाच-सहा जणांना अडवून दंड भरायला सांगितला. पण काही ना काही कारणाने कोणीही दंड भरला नाही. दिवसभरातील हा सगळा घटनाक्रम आठवल्याने त्यांच्यावरील तणाव आणखी वाढला. तेवढ्यात एका तरुणाला हवालदारसाहेबांनी गाडी बाजूला घ्यायला सांगितली. ‘आता कसल्याही परिस्थितीत याच्याकडून दंड वसूल करणार म्हणजे करणारच’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

त्याने हेल्मेट व मास्कही घातला होता. त्यामुळे गाडीच्या कागदपत्रांची व लायसनची मागणी साहेबांनी केली. त्यावर त्या तरुणाने सगळी कागदपत्रे दाखवली. ते पाहून हवालसाहेबांचा चेहराच पडला. त्याला जायला सांगणार, तेवढ्यात त्यांची ट्यूब पेटली. त्या तरुणाने कागदपत्रे व लायसन एका छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली होती. ‘‘तुझ्याकडे सगळी कागदपत्रे आहेत. मात्र, ती एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली आहेत आणि आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या वापरायला बंदी आहे. त्यामुळे त्याचा पाचशे रुपये दंड भर.’’ असे म्हणून त्याच्याकडून दंड वसूल केला. त्यानंतर हवालदारसाहेबांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पसरले.

सु. ल. खुटवड

(९८८१०९९०९०)

loading image
go to top