पिस्तुलाच्या धाकानं डॉक्टर दाम्पत्याची लूट; कात्रज बोगद्याजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

एका डॉक्‍टर दाम्पत्याला कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता घडली. 

पुणे - कोरोनामुळे बरेच दिवस घराबाहेर जेवणासाठी जाता न आल्यामुळे खेड शिवापूर येथे खास जेवण करण्यासाठी गेल्यानंतर तेथून घरी परत येत असताना एका डॉक्‍टर दाम्पत्याला कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिन्मय देशमुख (वय 32, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दुचाकीवरून आलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख व त्यांच्या पत्नी असे दोघेही डॉक्‍टर आहेत.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे बरेच दिवस बाहेर जेवण करण्यासाठी जाता आले नाही, त्यामुळे देशमुख दांपत्य रविवारी रात्री खेड शिवापूर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडे बारा वाजता ते बिबवेवाडी येथील त्यांच्या घरी परत येत होते. त्यावेळी कात्रज नवीन बोगद्यापासून 500 मीटर अंतरावर त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबविली. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तूल फिर्यादीच्या पत्नीच्या पोटाला लावून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. या प्रकारामुळे डॉक्‍टर दांपत्य घाबरले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील फिर्यादीकडील मनगटी घड्याळ, त्यांच्या पत्नीकडील सोन्याच्या दोन बांगड्या असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर आरोपी त्यांच्या दुचाकीवरून तेथून पसार झाले. या घटनेनंतर देशमुख यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor and his wife were robbed at gunpoint by two men near Katraj new tunnel