esakal | पुणे - घरात आढळला डॉक्टरचा मृतदेह, बेशुद्ध बहिणीचाही उपचारावेळी मृत्यु

बोलून बातमी शोधा

death

अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी डॉक्टर रॉय यांचा स्वच्छतागृहामध्ये मृतदेह आढळून आला

पुणे - घरात आढळला डॉक्टरचा मृतदेह, बेशुद्ध बहिणीचाही उपचारावेळी मृत्यु
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्‍टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्‍वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), गितीका सुधीर रॉय (वय 65) असे मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. डॉक्टर सुबीर रॉय हे नामवंत नेत्रतज्ज्ञ होते. त्यांची येरवडा व विश्रांतवाडी येथे क्‍लिनीक होते. डॉक्टर रॉय, त्यांची बहिण गितीका व भाऊ संजय असे तिघेजण एकाच घरात राहात होते.

गितीका व संजय या दोघांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांचे नातेवाईक काही दिवसांपासून डॉक्‍टरांशी संपर्क साधत होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शुक्रवारी त्यांचे नातेवाईक डॉक्टर रॉय यांच्या घरी आले. तेव्हा, गितीका या हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. तर संजय हे घरामध्येच बसले होते. डॉक्टर रॉय यांच्या खोलीमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. डेक्कन पोलिस घटनास्थळी गेले. मात्र डॉक्टर रॉय यांच्या बेडरुमचा दरवाजा बंद होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी डॉक्टर रॉय यांचा स्वच्छतागृहामध्ये मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ससूनला हलविला. त्याचबरोबर गितीकालाही ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डॉ.रॉय हे कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, गितीका यांच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचाही मृत्यु झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

डॉक्टर रॉय हे हुशार व स्वभावाने अतिशय चांगले होते. ते पश्‍चिम बंगालमधील कलकत्ता येथील मुळचे रहीवासी आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून डेक्कन येथेच राहात होते. बहिण गितीका व भाऊ संजय या दोघांचाही तेच सांभाळ करीत होते. डॉक्टर रॉय यांच्यापाठोपाठ त्यांच्या बहिणीचाही मृत्यु झाल्याने त्यांच्या मित्र व शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.