...अन्‌ डॉक्‍टर होऊन मित्राच्या लग्नाला पोचलेल्या तरुणावर काळाचा घाला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor reached friend wedding killed in accident IAS officer dream pune

...अन्‌ डॉक्‍टर होऊन मित्राच्या लग्नाला पोचलेल्या तरुणावर काळाचा घाला !

पुणे : तो डॉक्‍टर झाला, त्यानंतर पहिल्यांदाच थेट आपल्या बालपणीच्या मित्राच्या लग्नासारख्या आनंद सोहळ्याला त्याने आवर्जुन हजेरी लावली. मित्रांसमवेत गप्पा मारताना त्याने "आयएएस' अधिकारी व्हायचे स्वप्नही बोलून दाखविले. लग्नसोहळ्यातुन काही वेळ बाहेर येऊन रस्त्याने पायी चालत असतानाच तरुणावर काळाने अक्षरशः घाला घातला. मित्रासमवेत रस्त्याने गप्पा मारत जात असताना भरधाव कंटेनरने उडविल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्‍टरचा मृत्यु झाला. तर त्याचा अहमदाबादहून आलेला दुसरा मित्रही गंभीर जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करावे लागले. मित्राच्या लग्नाचा आनंद साजरा करीत असतानाच दुसऱ्या मित्राच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला !

अजिंक्‍य मोहन सांगळे (वय 26, सिंहगड रस्ता) असे अपघातात मृत्यु झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. तर मोहित मधुकर घोलप (वय 25, रा. विद्याविहार कॉलनी, माळवाडी) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी कंटेनर चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्‍य सांगळे याने दंतवैद्यकचे (बीडीएस) शिक्षण पुर्ण केले होते. मागील आठवड्यातच त्याचा निकाल लागला होता, त्यामध्ये तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डॉक्‍टर झाला होता. त्यामुमे त्याच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, अजिंक्‍य याच्यासमवेत ते राहात असलेल्या कॉलनीमध्ये बालपणापासूनच्या एका मित्राचे गुरुवारी कुंजीरवाडी येथील गोविंद सागर लॉन्स येथे लग्न होते.

त्यासाठी अजिंक्‍य, त्याचा वास्तुविशारद मित्र मोहित अहमदाबादहून पुण्याला आला होता. त्याचबरोबर त्यांचे मित्र धीरज कामे, आशिष उबाळे हे देखील लग्नसोहळ्यासाठी पोचले होते. लग्नसोहळ्यातच सर्व मित्रांची एकत्र गाठ पडली, तेव्हा अजिंक्‍यने त्यांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परिक्षा देऊन "आयएएस' अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याचे गप्पा मारताना सांगितले होते. त्यानंतर चौघेजण थंडपेय घेण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेले. तेथून दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अजिंक्‍य व मोहित हे दोघे रस्त्याच्याकडेने पायी चालत येत होते. तेवढ्यात भरधाव कंटेनरने दोघांनाही उडविले. तेव्हा, पुढे चाललेल्या आशिष व धीरजने हा अपघात पाहिला. दोघेही त्यांच्या मदतीसाठी धावले, परंतु अजिंक्‍यचा जागीच मृत्यु झाला होता. तर मोहित गंभीर जखमी झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यास रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केला, मात्र मदतीसाठी कोणीही येत नसल्याचे पाहून आशिषने स्वतःच कार आणून त्यास रुग्णालयात पोचविले. बालपणीच्या मित्राच्या लग्नसोहळ्यासाठी आलेल्या दोन मित्रांवर ओढवलेल्या या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

Web Title: Doctor Reached Friend Wedding Killed In Accident Ias Officer Dream Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top