कोरोनानंतर मुलांमधील "पिम्स' आजारासंबंधी डॉक्‍टरांचा सल्ला वाचा सविस्तर

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा 
Monday, 14 September 2020

आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध वंशातील मुलांमध्ये पिम्सच्या प्रसार आणि उपचारासंबंधी शोधनिबंध नुकताच एल्सवेअरच्या इक्‍लिनिकल मेडिसीन या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. 

पुणे - कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना अवयव दाहकता (पेडियाट्रीक मल्टिसिस्टीम इन्फ्लामेटरी सिंड्रोम, पिम्स) या आजाराने ग्रासण्याची शक्‍यता आहे. परंतु वेळेवर उपचार घेतल्यास या आजाराला घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे. 

जगभरामध्ये विशेषत- इंग्लंडमध्ये कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोनासदृश्‍य लक्षणे दिसणाऱ्या मुलांमध्ये अवयव दाहकता (पिम्स) हा आजार पाहायला मिळाला आहे. गुजरात, मुंबई, पुणे आदी शहरांत काही मुलांना हा आजार झाल्याचे खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टरांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध वंशातील मुलांमध्ये पिम्सच्या प्रसार आणि उपचारासंबंधी शोधनिबंध नुकताच एल्सवेअरच्या इक्‍लिनिकल मेडिसीन या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिम्स होण्याचे कारण - कोरोना उपचारादरम्यान विकसित झालेल्या प्रतिकारशक्ती विरुद्ध शरीराच्या प्रतिक्रियेतून हा आजार होतो. 
- पिम्सची लक्षणे - 
1) ताप 2) पोटात तीव्र वेदना 3) कमी रक्तदाब 4) अतिसार 5) सूज येणे 
- बाधितांचे वय - 5 ते 18 
- उपचाराची औषधे - 1) स्टेरॉईड 2) इम्यूनोग्लोब्यूलीन 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्ययनाचे निष्कर्ष - 
- कोरोनानंतर पिम्स होण्याची सर्वाधिक शक्‍यता 
- कोरोना आणि पिम्सच्या लक्षणांतील फरक ओळखणे गरजेचे 
- आजाराचे निदान, लक्षणे आणि उपचारासंबंधी तयारी ठेवावी 
- वेळेवर उपचार न मिळाल्यास आजाराचा धोका वाढतो 
- कोरोनाच्या तुलनेत मृत्यूदर जास्त 
- दीर्घकाळ अवयवांवर परिणाम जाणवू शकतो 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पालकांनी काय करावे? 
- पाल्याचे वय 18 पेक्षा कमी आणि कोरोना होऊन गेल्यास त्याच्यावर दोन ते तीन आठवडे लक्ष ठेवावे 
- तीव्र ताप आणि इतर लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्‍टरांशी संपर्क साधावा 
- पिम्स हा आजार संसर्गजन्य नसल्याने आणि उपचार उपलब्ध असल्याने धोका नाही 
- आजारातून बरे झाल्यानंतरही पुढील सहा ते आठ महिने अवयवांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवावे 

मुलांमधील कोरोना आणि पिम्सची तुलना - 
तपशील - पिम्स (एमआयएस-सी) - कोरोना 
- आजाराचा कालावधी - 8 दिवस - 14 दिवस 
- अतिदक्षता विभागात दाखल - 71 टक्के - 3 टक्के 
- मृत्यूचे प्रमाण - 1.7 टक्के - 0.09 टक्के 
- इतर आजार - 48 टक्के - 35.6 टक्के 

ससून रुग्णालयामध्ये अद्यापही असे रुग्ण आलेले नाहीत. साधारणपणे कोरोना होऊन गेल्यानंतर 14 दिवसांमध्ये हा आजार होऊ शकतो. तापाबरोबरच मुलांमध्ये सूज दिसल्यास त्यांना त्वरित डॉक्‍टरांकडे घेऊन जावे. उपचार उपलब्ध असल्याने पालकांनीही जास्त घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही. 
- डॉ. आरती किणीकर, 
बालरोगतज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor's advice on PIMS disease in children after corona