कुत्र्याकडून कृतज्ञतेचे अनोखे दर्शन; मालकाचा दशक्रिया विधी होईपर्यंत राहिला बसून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

बदललेल्या काळात रक्ताच्या नात्यातही जेथे दुरावा दिसत आहे, अशा काळात किरकटवाडी येथे एका कुत्र्याने आपल्या मालकाच्या दशक्रिया विधीमध्ये काकस्पर्श होईपर्यंत शांत बसून अनोख्या कृतज्ञतेचे दर्शन घडवले.

किरकटवाडी (पुणे) : बदललेल्या काळात रक्ताच्या नात्यातही जेथे दुरावा दिसत आहे, अशा काळात किरकटवाडी येथे एका कुत्र्याने आपल्या मालकाच्या दशक्रिया विधीमध्ये काकस्पर्श होईपर्यंत शांत बसून अनोख्या कृतज्ञतेचे दर्शन घडवले.

किरकटवाडीचे रहिवासी असणारे पुणे महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी अंकुश सोपानराव गबदुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. किरकटवाडी स्मशानभूमी येथे त्यांचा आज दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. जमलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये एक अनोखा नातलग या दशक्रियाविधीसाठी गबदुले यांचा 'बच्चा' नावाचा कुत्रा उपस्थित होता.

गेल्या बारा वर्षांपासून बच्चा गबदुले परिवाराचा अविभाज्य भाग बनला आहे. घरातील लहान थोरांशी त्याचं एवढं आपुलकीचं नातं जमलेलं आहे की, परिवारातील सुख दुःखातही बच्चा सहभागी होत आहे. "वडिलांच्या निधनापासून बच्चा ही निराश व दुःखी दिसत आहे.
बच्चाचे वय झाल्यामुळे त्याला नीट चालता व खाता येत नाही. आमचे वडील बच्चाच्या खाण्याविषयी विशेष काळजी घ्यायचे. मयतीसाठीही बच्चा आला होता व आज दशक्रिया विधी साठीहि तो सर्वांबरोबर चालत आला, अशी भाऊक प्रतिक्रिया अंकुश गबदुले यांचा मुलगा धनंजय गबदुले याने दिली.

हल्लीच्या बदलत्या युगात रक्ताच्या नात्या मध्येही दुरावा आल्याचे चित्र कित्येक वेळा पहावयास मिळते. अशातच बच्चाने आपल्या मालका विषयी दाखविलेली कृतज्ञता ही नकळत उपस्थित लोकांच्या डोळ्यांची कडा ओलावून गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog stayed silent until his Owners ritual

टॅग्स