esakal | कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

तरुण मुली शक्‍यतो लहान आकाराच्या जातीचे पपीज अर्थात टॉय ब्रीड घेताना दिसतात. वजनाने हलके, बाजारात जाताना सहज उचलून नेता येतील, अगदी सॅकमध्येही मावतील एवढ्या आकाराच्या छोट्या जातींतील कुत्र्यांची खरेदी तरुणी करतात. 

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - घराचा रखवालदार, इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा, असं आपण वाचत ऐकत आलो आहोत; पण घरात कुत्रा असणं, ही आता प्रतिष्ठेची बाब समजली जात आहे. घरात महागड्या आणि परदेशी जातीचे ‘पपी’ज पाळणं ही काही वर्षांपूर्वी केवळ उच्चभ्रूंचीच मक्तेदारी समजली जात होती. त्यांच्याकडे असणारे डॉग्जदेखील एका ‘प्रीमियम क्‍लास’चे असायचे. मात्र, आता सर्वच स्तरातील प्राणिप्रेमी उच्च दर्जाचे पपीज विकत घेताना दिसत आहेत. त्याच कारण आहे स्टेटस.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

या घरातील कुत्र्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वाढवले जाते. मात्र, त्याच्या आरोग्य आणि दिसण्यावरही विशेष खर्च केला जातो. कारणही पुन्हा एकदा तेच स्टेटस. हे झालं कुटुंबांच. मात्र, नोकरी, व्यावसायानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या तरुणांमध्ये हौसेबरोबरच चारचौघांमध्ये मिरवण्यासाठीही कुत्रा पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातही मुला-मुलींची आवड वेगवेगळी आहे. तरुण मुली शक्‍यतो लहान आकाराच्या जातीचे पपीज अर्थात टॉय ब्रीड घेताना दिसतात. वजनाने हलके, बाजारात जाताना सहज उचलून नेता येतील, अगदी सॅकमध्येही मावतील एवढ्या आकाराच्या छोट्या जातींतील कुत्र्यांची खरेदी तरुणी करतात. 

तपासली जाते वंशावळही
सकाळी जॉगिंगसाठी बरोबर नेता येतील, किंवा ज्यांना अगदी जीममध्ये बरोबर नेता येईल, असे धष्टपुष्ट आणि उंच चणीचे, चपळ डॉग्ज तरुण विकत घेतात. ज्यामध्ये ‘गोल्डन रेट्रिबर’, ‘डॉबरमॅन’, ‘जर्मन शेफर्ड’, ‘लॅब्रेडॉर रिट्रीवर’ अशा जातीकडे तरुणांचा कल आहे. त्यांची किंमत किमान १५-२० हजार रुपयांपासून सुरू होते. त्यांची उंची, चपळता, डोळ्यांचा रंग, अंगकाठी या सगळ्याच बाबींबरोबरच हे पपीज विकत घेताना त्यांची वंशावळ काय, हेदेखील पाहिलं जातं. त्यानुसार उच्च प्रतीच्या पपीज घेण्यासाठी लाखो रुपयेही मोजले जातात.

पेट इंडस्ट्री अन्‌ ऑनलाइन देवाण-घेवाण
पाळीव प्राण्यांची देखभाल करण्यासाठी त्यांचे अन्नपदार्थ तसेच अन्य सेवा देण्यासाठी विविध संस्था, कंपन्या पुढाकार घेतात. श्‍वानांच्या खरेदीविक्रीबरोबरच ही पेट इंडस्ट्री गेल्या काही वर्षांत मोठ्या वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे, काही तरुण श्‍वानांना सांभाळून त्यांना होणाऱ्या पिलांची विक्री ऑनलाइनही करतात. तसेच या उद्योगाशी संबंधित तरुणांच्या स्टार्टअप्सनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘सायबेरियन हस्की’ची क्रेझ
गेल्या चार ते पाच वर्षांपासून ‘सायबेरियन हस्की’ या परदेशी ब्रॅंडची क्रेझ तरुणांमध्ये आहे. या जातीतील प्राण्यांचे निळे लाल डोळे, कोल्ह्याप्रमाणे असणारी अंगकाठी, उभे कान, शेपटी यामुळे परदेशातून ही जात आयात करण्यात येत असल्याचेही पेट विक्रेत्यांनी सांगितलयं. विशेष म्हणजे अनेकदा आपल्याला हस्कीचे डोळे कोणत्या रंगांचे हवेत, यासाठी खास ब्रिडिंग करण्यात येतं. त्यासाठी ६० हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत देण्यासही तरुण तयार असल्याचं विक्रेते प्रशांत जगताप यांनी सांगितले. एखाद्या पपीच्या किमतीबरोबरच त्याचा खुराक, त्याने कोणतं प्रशिक्षण घेतलं आहे. तो किती स्पर्धा जिंकला आहे, या सगळ्याचीही खास नोंद ठेवली जाते, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top