आपलेच झाले वैरी!

आपलेच झाले वैरी!
Published on: 

पिंपरी, ता. ४ : प्रेम, विश्वास आणि आधाराचे नाते असलेल्या कुटुंबातच वाद विकोपाला जाऊन हल्ल्याच्या घटना घडत आहेत. पतिपत्नीमधील कौटुंबिक वाद, वडिलांशी झालेला संघर्ष, आजी-नातवातील वाद अशा वेगवेगळ्या कारणांतून मारहाण, गंभीर दुखापत आणि काही प्रकरणांत खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘घरातील व्यक्तीच सुरक्षित आहेत का?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कौटुंबिक वादाला सुरुवात अनेकदा किरकोळ कारणावरून होते. मात्र, रागाच्या भरात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली जाते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास लोखंडी वस्तू, लाकडी दांडके किंवा इतर वस्तूंचा वापर करून हल्ला केला जातो. काही घटनांमध्ये या हिंसाचाराचे पर्यवसान मृत्यूपर्यंत झाल्याचेही समोर आले आहे.
पतिपत्नीमधील मतभेद हे प्रत्येक कुटुंबात होऊ शकतात. मात्र, संवादाऐवजी राग, संशय आणि आक्रमकतेचा मार्ग स्वीकारला जात असल्याने वादाचे रूपांतर मारहाणीत होत आहे. घरगुती वादातून एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रारी दाखल होतात.

नात्यांपेक्षा राग मोठा होतोय?
कुटुंबातील मतभेद सोडविण्यासाठी संवाद, संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. मात्र, समाज माध्यम, आर्थिक ताण, व्यसनाधीनता, संशय, अहंकार, मानसिक ताण आणि सततचे कौटुंबिक मतभेद यामुळे काही जणांचा संयम सुटत असल्याचे दिसून येते. रागाच्या क्षणी विवेक हरवल्याने समोरची व्यक्ती आपलीच आई, वडील, पत्नी, पती किंवा आजी आहे, याचाही विसर पडत असल्याचे दिसून येते.

मागील महिनाभरातील घटना

२५ ऑगस्ट - गहुंजे येथे सून आणि तिच्या नातेवाइकांकडून सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न

२ सप्टेंबर - बावधन येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार हत्याराने गळा चिरून खून

११ सप्टेंबर - थेरगाव येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर दगडाच्या खलबत्त्याने जीवघेणा हल्ला

१५ सप्टेंबर - मोशी येथे पतिपत्नीच्या वादात सासूने विचारणा केल्याच्या रागातून जावयाने तिच्या डोक्यावर आणि हातांवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

१६ सप्टेंबर - जेवण बनवण्याच्या वादातून पिंपरी येथे पत्नी आणि सासऱ्याची जावयाला मारहाण

१७ सप्टेंबर - घरात सतत बडबड करून झोपेतून उठविल्याच्या रागातून चऱ्होली येथे नातवाने केला ७५ वर्षीय आजीचा खून

२० सप्टेंबर - पत्नीने गावी शेती घेण्यासाठी विरोध केल्याने देहूगाव येथे पतीकडून पत्नीची हत्या

२६ सप्टेंबर - घर सोडून जात असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात चिंचवड येथे भावाच्या पोटात चाकू खुपसला

१ ऑक्टोबर - चारित्र्यावर संशय घेत काम सोडण्याच्या कारणावरून रहाटणीत पतीकडून पत्नीवर चाकूने वार


नात्यांमध्ये पुन्हा संवाद वाढविण्यासह जवळच्या व्यक्ती काय अनुभवत आहेत, काय सहन करत आहेत, हे ऐकून घेण्याची गरज आहे. अनेकदा माणसाला उपायांपेक्षा आधी समजून घेणाऱ्यांची आवश्यकता असते. नाती रोजच्या संवादातून, आदरातून आणि परस्पर समजुतीतून घडत असतात. त्यामुळे अशा प्रत्येक घटनेकडे केवळ धक्कादायक बातमी म्हणून न पाहता, आपल्या नात्यांचा आणि भावनिक आरोग्याचा आरसा म्हणून पाहण्याची गरज आहे.
- प्रदीप सातपुते, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com