देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

...तर १५० कोटींचे नुकसान
उन्हाळ्यातील पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे ३० हजार असते. या पर्यटकांमुळे प्रवास, निवास, भोजन आणि स्थानिक वाहतूक या सर्व बाबींच्या माध्यमातून सुमारे १५० कोटी रुपयांची उलाढाल होते. यापैकी सुमारे ९० टक्के पर्यटकांनी त्यांचे पर्यटन रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ते रोज त्यासाठी फोन करत आहेत. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून होणाऱ्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या उलाढालीचे नुकसान होणार असल्याचे ‘एडीटीओआय’च्या वतीने सांगण्यात आले.

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रभाव नसलेले देश आणि देशांतर्गत पर्यटनास कोरोनाचा कसलाही धोका नाही. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाची धास्ती घेऊ नये. केंद्र सरकारमार्फत प्रसारित करण्यात येत असलेल्या पर्यटन मार्गदर्शिकेनुसार (ट्रॅव्हल ॲडव्हॉयझरी) देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर इन इंडियाने (एडीटीओआय) केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशांतर्गत टुर्स आणि कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या देशात आजही पर्यटक जात आहेत. अशा ठिकाणी जाऊन आलेल्यांचे अनुभव चांगले आहेत. या पर्यटकांच्या म्हणण्यानुसार तेथील सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे संघटनेचे विजय मंडलिक, नितीन शास्त्री आणि सारंग भिडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी राजेश आरगे, सुरेंद्र कुलकर्णी, मंदार सत्रे, संतोष खवले आदी उपस्थित होते.

नोकरी गेल्यामुळं तरुणावर आली चोरीची वेळ; पुण्यातला धक्कादायक प्रकार

भिडे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या धास्तीने अनेक पर्यटक एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पर्यटनाचे बुकिंग रद्द करू लागले आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३० हजार पर्यटक पर्यटनासाठी जातात. यापैकी ९० टक्के पर्यटक त्यांचे बुकिंग रद्द करण्याची मागणी करू लागले आहेत. याचा तोटा पर्यटकांनाच होणार आहे. कारण, भारतात कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाला धोका नाही. पर्यटनासाठी पुढची परिस्थिती पाहून पर्यटकांनी निर्णय घ्यावा.’’

उन्हाळ्याच्या सुटीतील पर्यटनासाठीची विमान तिकिटे अजूनही माफक दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे; अन्यथा ऐनवेळी याच तिकिटासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. परिणामी, आजच्या कालावधीत पर्यटनाचे बुकिंग रद्द करण्याचा तोटा पर्यटकांनाच होणार असल्याचे संघटनेने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont be afraid of domestic tourism because of Coronavirus