वाहतूक बंदमध्ये पीएमपी बस नको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

बससाठी रस्ते राखून ठेवा 
शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता आदी रस्त्यांवर कोणत्याही मिरवणुका अथवा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देताना सुमारे साडेतीन मीटर रुंद रस्ता बस वाहतुकीसाठी राखून ठेवावा; तसेच प्रमुख रस्ते हे सार्वजनिक वाहतुकीसाठीचे ‘कॉरिडॉर’ असावेत, अशी मागणी पादचारी प्रथम संस्थेने आयुक्तांकडे केली आहे.

पुणे - शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद करताना पीएमपी बसचा त्यात समावेश करू नये, अशी मागणी ‘पादचारी प्रथम’ संस्थेने पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर पीएमपीला प्राधान्य द्या; अन्यथा लाखो प्रवाशांचे हाल होतील, असेही त्यात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्ष, गणेश जयंती, चतुर्थी आदी दिवशी वाहतूक पोलिस शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद करतात. त्याचा फटका सुमारे दोन ते अडीच लाख पीएमपी प्रवाशांना बसतो. 

या रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यामुळे बसच्या सुमारे दोन हजार फेऱ्या रद्द होतात. तसेच पीएमपीचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान होते, असे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीला पोलिसांनी प्राधान्य द्यायला हवे. वाहतुकीवर निर्बंध आणताना प्रथम दुचाकी, चारचाकी वाहनांवर आणावेत. बसची वाहतूक बंद करणे हा शेवटचा पर्याय असावा. वाहतुकीला बंद करण्याची पूर्वसूचना किमान दोन दिवस आधी देण्याची मागणी ‘पादचारी प्रथम’चे प्रशांत इनामदार यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont need a PMP bus in the traffic stop