Pune : विद्युत विभागाकडून आरोग्य विभागाला हस्तांतरित केलेल्या निधीवर शंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

विद्युत विभागाकडून आरोग्य विभागाला हस्तांतरित केलेल्या निधीवर शंका

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोना काळात विद्युत विभागात निविदा न काढता बोगस बिल सादर करून सुमारे १ कोटीचा निधी लाटण्याच्या प्रयत्न झाला. याच काळात विद्युत विभागाकडून २० पेक्षा जास्त कामांसाठी ७० लाखापेक्षा जास्त रक्कम आरोग्य विभागाला उपलब्ध करून दिली होती. ही कामे प्रत्यक्षात झाली आहेत की केवळ कागदावर खर्ची पडली आहेत याबाबत प्रशासनाकडून शंका घेतली जात असल्याने त्याबाबत ही चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.

वैकुंठ स्मशानभूमीसह इतर ठिकाणी दुरुस्तीचे काम केल्याचे भासवून ठेकेदाराने बोगस बिले सादर केली. हे एक कोटी रुपयांच्या बिलावर विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने यास गंभीर वळण लागले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात स्मशानभूमी, आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात कामे झाली. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. याच काळात विद्युत विभागाने आरोग्य विभागातील कोरोनाच्या विविध कामांसाठी लॉकिंगद्वारे निधी दिला आहे.

बाणेर येथील कोव्हीड हॉस्पिटल येथे सर्व्हिलंस यंत्रणा बसविण्यासाठी दोन टप्प्यात १९ लाख ८० हजार रुपयांचा निधी दिला. कमला नेहरु रुग्णालयात १५ पॅसेजर क्षमतेचे ५ लिफ्ट बसविण्याच्या कामासाठी दोनवेळा पैसे दिले. हडपसर येथील अण्णासाहेब मगर दवाखान्यात कोव्हीड केअर केंद्रातील ऑक्सिजन पाईपलाईनसाठी १९ लाख ४१ हजाराचा निधी दिला. तसेच या रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेसाठी निधी दिला आहे. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांचे कोव्हीड केअरसाठी युपीएस पुरविण्याच्या कामासाठी १० लाख ४४ हजार, सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ९ लाख ९९ हजार रुपये आरोग्य विभागाकडे दिले आहेत.

राजीव गांधी रुग्णालयातील डायलिसिस सेंटर, नायडू रुग्णालयाच्या परिसरातील मोठया प्राण्यांचे इन्सीनरेटरची देखभाल दुरुस्तीसाठी निधी दिला आहे. वैकुंठ व बिबवेवाडी येथील विद्युत दाहिनी क्रमांक १,२,३ शवदाहिन्यांचे वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे, वैकुंठ स्मशानभुमी येथे पर्यावरणपुरक शवदहन करणे, युगपुरुष राजा शिवछत्रपती दवाखाना येथे विद्युत विषयक काम, वारजे येथील निर्माणाधीनकोव्हीड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन पाइपलाइन, विद्युत व्यवस्थेच्या कामासाठी १३ वेळा निधी लॉक करून देण्यात आला आहे. स्मशानभूमीतील विद्युत विषयक कामासाठी ८ वेळा, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी परिमंडळ ४ व ५ अंर्तगत रुग्णालये व विलगीकरण कक्षासाठी युपीएसची कामे करण्यासाठी चारवेळा निधी लॉकिंग केले आहे. एक प्रकारच्या कामासाठी वारंवार निधी उपलब्ध करून दिला आहे, ही कामे प्रत्यक्षात झाली की नाही? याबाबततपासणी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

loading image
go to top