वाई:-डी.पी.चोरी प्रकरणी सहा जणांना अटक. १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई
डीपी चोरीप्रकरणी सहा जणांना अटक
वाई गुन्हे प्रकटीकरणची कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वाई, ता. २४ : रोहित्रामधील (डीपी) तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या सहा संशयितांना वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
मुकेश माणिक जाधव (वय ४५), अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२), अर्जुन राजू जाधव (वय २०, तिघेही रा. मलठण, फलटण), रोहन लाखन घाडगे (वय २४), विजय बाबूराव शिंदे (वय ३६) मनोज नामदेव घाडगे (वय ४०, तिघेही रा. यशवंतनगर, वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काही दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोहित्राचे (डीपी) नुकसान करून त्यामधील तांब्याच्या तारेच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. या गुन्ह्याचा तपास करून संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्याच्या आधारे शोध सुरू केला.
रोहित्र हे धोम कॅनॉलच्या कडेला असल्याने तसेच सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. तपास पथकातील अंमलदार विशाल शिंदे, हेमंत शिंदे यांचे तांत्रिक विश्लेषण व अंमलदार विक्रम धोत्रे, श्रावण राठोड यांच्या बातमीदारांमार्फत संशयितांचा शोध घेतला असता यातील तिघे फलटण येथील, तर त्यांना मदत करणारे तिघे वाईतील असल्याचे समोर आले.
त्यानुसार सर्व संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुद्देमालापैंकी ३०० किलो तांब्याची तार, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व एक मोटार, पाच मोबाईल असा एकूण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या संशयितांकडून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
कारवाईत पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, हवालदार अजित जाधव, अंमलदार नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, मारोती लोलापोड, पोलिस पाटील संदेश वैराट, जनार्दन गोळे यांनी सहभाग घेतला.
---------------------
07615
वाई : डीपी चोरीप्रकरणातील संशयितासमवेत सुनील साळुंखे, अमोल गवळी, सुधीर वाळुंज व पोलिस कर्मचारी.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

